स्वयंम न्युज ब्युरो
नवी मुंबई : गुरुवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास सिवूड्स सेक्टर ४८ येथे ११६ सदनिकांच्या साई संगम या सिडकोच्या सोसायटीमध्ये बिल्डींग नं डी ४२ मधील ६ नंबरच्या सदनिकेत स्लॅप कोसळला. या घटनेत सदनिकेचे नुकसान झाले. पालिका प्रशासनाला कळविल्यावर तात्काळ अधिकारी येवून गेले. सिडकोला कळविले असता, काम करून घ्या, असे उत्तर सिडकोच्या अधिकार्यांकडून देण्यात आले. निकृष्ठ बांधकामामुळे धोकादायक झालेल्या इमारतींमध्ये माणसे दगावल्यावरच सिडको या इमारतींची डागडूजी करणार काय असा संतप्त सवाल स्थानिक शिवसेना शाखाप्रमुख विशाल विचारे यांनी सिडकोला विचारला आहे.
सिवूडस सेक्टर ४८ मध्ये सिडकोने उभारलेल्या इमारती या निकृष्ठ बांधकाम कशाप्रकारे असू शकते व जिवितहानीला लवकरात लवकर निमंत्रण कसे मिळू शकते याचा उत्तम नमुना असल्याचा आरोपही शिवसेना शाखाप्रमुख विशाल विचारे यांनी केला आहे.
गुरूवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास समीर नारकर यांच्या सदनिकेत स्लॅब कोसळला. हा स्लॅब सदनिकेतील हॉलला लावलेल्या पियूपीसकट खाली कोसळला. पंखा पूर्णपणे वाकलेला असून सदनिकेतील छताच्या लोखंडी सळ्या स्पष्टपणे दिसत आहे. या सदनिकेत समीर, त्यांची पत्नी, आई व मुलगा राहत आहे. हॉलमधील अंथरून काढून गोधड्या हात ठेवण्यासाठी बेडरूममध्ये गेल्यामुळे कोणत्याही प्रकारची जिवितास दुर्घटना झाली नाही.
सिवूड्स सेक्टर ४८ मधील धोकादायक इमारतींची डागडूजी सिडकोने करावी यासाठी गेल्या काही वर्षापासून शाखाप्रमुख विशाल विचारे सिडकोकडे पाठपुरावा करत आहे. पूर्वी सिडको या परिसरातील धोकादायक इमारतींची डागडूजी करून देत असे. परंतु सहा महिन्यापासून सिडकोने हे काम थांबविल्याने समस्या गंभीर झाल्याचे विशाल विचारे यांनी सांगितले.
सिडकोच्या नवीन एमडींची भेट घेवून त्यांना याबाबत सांगितले असता, त्यांनी मी नवीन आहे. प्रकरण समजावून घेण्यास वेळ द्या, असे सांगितले आहे. येथील लोकांना पुनबार्ंधणी नको तर डागडूजी तरी सर्वप्रथम करून देण्याची मागणी विशाल विचारे यांनी केली आहे.