शिवसेना खासदार राजन विचारे यांच्या प्रयत्नांना यश
मुंबई : ठाणे-ऐरोली-कळवा प्रकल्पातील अडथळा ठरणाऱ्या झोपडपट्ट्यांच्या पुनर्वसनाला मंजुरी मिळाली असून यासाठी शिवसेनेचे ठाण्यातील खासदार राजन विचारे गेल्या काही महिन्यापासून पाठपुरावा करत होते. मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्वत: यात लक्ष घातल्यामुळे या कामाला गती मिळाली आहे.
ठाणे रेल्वे स्थानकातील होणारा अतिरिक्त भार कमी करण्याच्या दृष्टिकोनातून ऐरोली कळवा या महत्वाकांक्षी प्रकल्पाच्या कामाचे भूमिपूजन डिसेंबर २०१६ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होऊन सुद्धा, या कामाला सुरुवात झाली नसल्याने खासदार राजन विचारे यांनी या कामासाठी मिळवलेल्या ४२८ कोटीचा निधी परत जावू नये व हा प्रकल्प रखडू नये यासाठी त्यांनी या प्रकल्पाचे रूपांतर दोन टप्प्यात करून दिघा रेल्वे स्टेशनचे काम सुरू करून घेतले आहे. दुसऱ्या टप्प्यातील या बाधित होणाऱ्या झोपड्यांचे पुनर्वसन राज्य शासनामार्फत होणार असल्याची कबुली मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यावेळी आपल्या भाषणात दिली असल्याने त्याची अंमलबजावणी होत नव्हती. यासाठी लोकसभेत या प्रकल्पाचे काम सुरू करण्यासाठी राज्य शासन दखल घेत नाही, यासाठी केंद्र शासनाने राज्य शासनास तसे आदेश पारित करावे अशी चर्चा शून्य प्रहर मध्ये करण्यात आली होती. खासदार राजन विचारे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना वारंवार भेटी देऊन या प्रकल्पाच्या बाधित होणाऱ्या झोपड्यांचे पुनर्वसन एम.एम.आर.डी. एकडून होत नाही असे पत्राद्वारे कळविण्यात आले होते.
नुकताच १३ ऑगस्टला सिडको गृहनिर्माण योजना ऑनलाईनचे उद्घाटन प्रसंगी मुख्यमंत्री फडणवीसांना यासंदर्भात पत्र देऊन पुन्हा आठवण करून दिली. त्यावेळी नगर विकास विभागाचे प्रधान सचिव भूषण गगराणी यांनी एम.एम.आर.डी.एचे पुनर्वसन अधिकारी विश्राम पाटील यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. त्याच दिवशी एम.आर.व्ही.सीचे व्यवस्थापकीय संचालक खुराणा यांची भेट घेऊन या प्रकल्पामध्ये २००९ बाधित झोपड्यांच्या पुनर्वसनाचा सुधारित आराखडा एम.एम.आर.डीए ला १६ऑगस्टला दाखल करण्यात आला. याला मंत्रिमंडळाची नुकतीच मंजुरी मिळाली असून या झोपडपट्टी पुनर्वसनाचे कार्यवाही सुरू झाल्याने खासदार राजन विचारे यांच्या अथक प्रयत्नांना यश आले आहे. सदर प्रकल्पाची मान्यता मिळवून दिल्याबद्दल खासदारांनी मुख्यमंत्री फडणवीस, प्रधान सचिव भूषण गगराणी व डॉ. नितीन करी यांचे आभार मानले.