सुजित शिंदे : ९६१९१९७४४४
पनवेल : सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पनवेल आणि मुंबई मराठी पत्रकार संघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या १७ व्या राज्यस्तरीय आणि जिल्हास्तरीय दिवाळी अंक स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ गुरुवार दिनांक ३० ऑगस्ट २०१८ रोजी सकाळी ११ वाजता पनवेलमध्ये होणार आहे.
दिवाळी अंक म्हणजे मराठी साहित्याचा उत्सव, संस्कृती आणि परंपरा असून दिवाळी अंकाच्या निमित्ताने महाराष्ट्रात दर्जेदार दिवाळी अंकाची निर्मिती व्हावी तसेच वाचकांना साहित्याची मेजवानी मिळावी, त्याचबरोबरीने कवी, लेखक, साहित्यिकांना प्रोत्साहन मिळावे, यासाठी श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि मुंबई मराठी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी राज्यस्तरीय आणि जिल्हास्तरीय दिवाळी अंक स्पर्धा अखंडपणे आयोजित केली जात आहे.
खांदा कॉलनी येथील चांगु काना ठाकूर आर्टस्, सायन्स , कॉमर्स महाविद्यालयाच्या सभागृहात माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा होणार असून यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ९१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख, ज्येष्ठ साहित्यिक व नामवंत प्रकाशक रामदास भटकळ, बृहन्मुंबईचे अतिरिक्त पोलीस आयुक्त रवींद्र शिसवे, मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे, ९० व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष गुलाब वझे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. पुरस्कारप्राप्त मानकरींचा सन्मान करण्याबरोबरच या समारंभात श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळातर्फे प्रकाशित होणाऱ्या ‘हे थेंब अमृताचे’ या पुस्तकाचे प्रकाशन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार असून या समारंभाचा साहित्य रसिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, उपाध्यक्ष अरुणशेठ भगत, संयोजक दीपक म्हात्रे, ज्येष्ठ पत्रकार नीला उपाध्ये, मुंबई मराठी पत्रकार संघाचे संदीप चव्हाण यांनी केले आहे.