सुजित शिंदे : ९६१९१९७४४४
नवी मुंबई : नेरूळ सेक्टर सहा परिसरात तसे महापालिकेच्या नेरूळ प्रभाग समिती कार्यक्षेत्रात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमी महापालिका प्रशासनाने कृत्रिम तलाव निर्माण करण्याची मागणी पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते संदीप खांडगेपाटील यांनी महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी आणि महापौर जयवंत सुतार यांच्याकडे ४ सप्टेंबर रोजी लेखी निवेदनातून केली आहे.
नेरूळ सेक्टर सहा परिसरात सिडकोच्या हिमालय व वरूणा सोसायटीच्या मध्यभागी असलेल्या हनुमान मंदिरासमोरील भाजी मार्केट क्रिडांगण आहे. आगामी महिन्यात गणेशोत्सव आहे. जुईनगरच्या चिंचोली तलावावर, पामबीच मार्गावरील ज्वेल ऑफ नवी मुंबई तलाव आणि नेरूळ गावासमोरील सेक्टर १८ तलाव या ठिकाणी गणेश विसर्जनाच्या वेळी गर्दी होते. पोलिसांना तसेच वाहतुक पोलिसांनाही कमालीचा ताण पडतो. भाविकांना त्रास सहन करावा लागतो. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी नेरूळ सेक्टर सहामधील भाजी मार्केट मैदानावर तसेच महापालिकेच्या सेक्टर सहामधील तानाजी मालुसरे क्रिडांगणावर महापालिका प्रशासनाने कृत्रिम तलाव तयार करावा. त्यामुळे घरगुती गणेश मूर्तींचे व सार्वजनिक गणेश मूर्तींचे या ठिकाणी विसर्जन करण्यात येईल व इतर ठिकाणी ताण कमी होईल. तसेच आपल्या प्रभाग समिती कार्यक्षेत्रात अन्यत्रही मोठ्या मैदानांवर कृत्रिम तलाव निर्माण केल्यास भाविकांना त्यांच्याच परिसरात गणेश विसर्जन करणे शक्य होईल. गणेशोत्सव संपताच कृत्रिम तलाव बुजवून जागा पूर्ववत करावी. तरी आपण या समस्येवर तोडगा म्हणून कृत्रिम तलावांची ठिकठिकाणी लवकरात लवकर उभारणी करण्याची मागणी संदीप खांडगेपाटील यांनी महापालिका आयुक्त व महापौरांकडे केली आहे.