करावेत गणपतशेठ तांडेल मैदान सुशोभिकरणाच्या कामाचा शुभारंभ
नवी मुंबई : सिडको इमारतींखालील जमिनी फ्री होल्डच झाल्या पाहिजेत, अशी आमची मागणी असून लीज डीड वाढवून मालकांना भाडोत्री करणार्या प्रवृत्तींना लोकनेते गणेश नाईक यांनी बुधवारी फटकारले. लोकनेते नाईक यांच्या शुभहस्ते करावे येथील गणपतशेठ तांडेल मैदानातील प्रदर्शनी जागेच्या सुशोभिकरणाच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. त्याप्रसंगी ते मार्गदर्शन करीत होते.राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस डॉ. संजीव गणेश नाईक, माजी महापौर सागर नाईक, नगरसेवक विनोद म्हात्रे, ज्येष्ठ समाजसेवक विनायक म्हात्रे, विधी समिती सभापती गणेश म्हात्रे,क्रीडा समिती सभापती विशाल डोळस,माजी परिवहन समिती सभापती प्रदीप गवस, प्रभाग समिती सदस्य सय्यद अफसर इमाम, समाजसेवक सुधाकर म्हात्रे,अशोक तांडेल,गणेश तांडेल,प्रसन्न कडू,राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे सीवूड तालुका अध्यक्ष अमित मढवी,कर्नल झुलका,हरिशचंद्र तांडेल,छबूनाणा मढवी,नारायण म्हात्रे,प्रसाद तांडेल,राम भोईर,बाबाजी तांडेल,निशीकांत तांडेल,डी.जी. भोईर,पी.के.पाटील,किशोर पाटील,रतन मढवी,देवनाथ तांडेल,देविदास म्हात्रे,राकेश तांडेल,रत्नाकर पाटील तसेच करावेगांव ग्रामस्थ मंडळ आणि ४० प्लसचे खेळाडू उपस्थित होते. सिडकोने तांडेल मैदान पालिकेकडे ते उद्यान, प्रदर्शनीसाठी आणि खेळासाठी या तीन वापरासाठी हस्तांतरित केले होते मात्र कोणत्या कारणासाठी मैदानातील किती जागा वापरायची याची स्पष्टता नव्हती.
त्यामुळे जेव्हा प्रदर्शनी भरायची तेव्हा करावेतील खेळाडूंना खेळण्यात अडथळा निर्माण होत असे. माजी नगरसेविका रेखा म्हात्रे यांनी याबाबत पालिकेच्या महासभेत ठराव मांडून प्रत्येक कारणासाठी क्षेत्रफळ निश्चित करुन घेतले होते. त्यानंतर नगरसेवक विनोद म्हात्रे यांनी या मैदानाचे सुशोभिकरणाचे काम मार्गी लावले. प्रत्येक कारणासाठी क्षेत्रफळ ठरल्याने आता खेळाडूंना १२ महिने निर्धोकपणे खेळता येणार आहे. त्याचबरोबर प्रदर्शन भरविण्यात अडचण येणार नाही. एकूण ३६४०० चौरस मीटर मैदानात साडेपाच एकर जागा खेळासाठी मैदान म्हणून अडीच एकर जागा प्रदर्शनासाठी राखीव राहणार आहे. सुरुवातीला मैदानाला कुंपण घालण्यात येणार असून त्यामध्ये विद्युत व्यवस्था देखील करण्यात येणार आहे. रेखा आणि विनोद म्हात्रे यांच्या पाठपुराव्याचे लोकनेते नाईक यांनी कौतुक केले. आपल्या भाषणात लोकनेते नाईक यांनी करावे गावातील गणपतशेठ तांडेल, विनायक म्हात्रे, दिनकर बारशा,पाटील मधुकर तांडेल, सुधाकर म्हात्रे. रेखा म्हात्रे, माजी महापौर विजयाताई म्हात्रे आदींचा करावेच्या विकासातील भरीव योगदानाचा गौरवपूर्ण उल्लेख करुन त्यांची परंपरा माजी नगरसेविका रेखा म्हात्रे आणि विद्यमान नगरसेवक विनोद म्हात्रे यांनी पुढे सुरु ठेवल्याचे गौरवोद्गार काढले.