मुंबई – भाजप नेते आणि सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी 24 तासांच्या आतच आपल्या विधानावरुन पलटी मारली आहे. यापुढे मी कोणतीही विधानसभा किंवा लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे पाटील यांनी गुरुवारी म्हटले होते. मात्र, शुक्रवारची सकाळ उजाडताच चंद्रकांत पाटील यांनी आपल्या वक्तव्यावरुन घुमजाव केले. मी राजकीय सन्यास घेणार नाही, असे स्पष्ट करत माझ्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचे त्यांनी म्हटले.
कोल्हापूरचे पालकमंत्री आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी मोठा निर्णय जाहीर केला. यापुढच्या काळात मी कोणतीही निवडणूक लढवणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं. चंद्रकांत पाटलांच्या या विधानानं भाजपासह राज्यभरात खळबळ उडाली. कोल्हापूरयेथे पोलीस दलातर्फे गणराया अवॉर्ड वितरण सोहळ्यामध्ये त्यांनी हा निर्णय जाहीर केल्याने याचीच चर्चा कार्यक्रमानंतर रंगली. मात्र, या विधानाला अद्याप 24 तासही उलटले नाहीत, तोपर्यंत पाटील यांनी मी राजकीय सन्यास घेणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. यावरुन 24 तासांतच चंद्रकांत पाटील यांनी आपला शब्द बदलल्याचे दिसून येत आहे.