नवी मुंबई : महापालिकेत काम करणार्या मूषक नियत्रंण कामगारांची ससेहोलपट थांबण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत. ऑगस्ट महिना संपत आला तरी मूषक नियत्रंणच्या कामगारांना अजून जुलै महिन्याचा पगार या कामगारांना अजून मिळालेला नाही. स्वातंत्र्यदिन गेला, रक्षाबमधन गेले, आता गणपती जवळ आला, आमचा पगार भेटणार तरी कधी असा संतप्त सवाल मूषक नियत्रंणच्या कामगारांकडून विचारला जात आहे.
मूषक नियत्रंण विभागात ५० कामगार काम करत आहे. मनी नावाच्या ठेकेदाराच्या माध्यमातून पालिका प्रशासनदरबारी हे कामगार काम करत आहेत. गेल्या अनेक वर्षापासून या कामगारांची आर्थिक ससेहोलपट सुरू असून या कामगारांना वेतन कधीही वेळेवर मिळत नाही. दोन ते तीन महिन्याच्या विलंबानेच वेतन नेहमी देण्यात येते.
कामगारांना घरभाडे, मुलांचे शिक्षण, घरखर्च आदी भागविताना नाकीनऊ येत आहे. नुकताच रक्षाबंधनचा सणही या कामगारांना रिकाम्या हातानेच साजरा करावा लागला. गेल्या अनेक वर्षापासून वेतन विलंबामुळे मूषक नियत्रंणच्या कामगारांना कर्ज काढूनच संसार करावा लागत आहे. अनेकदा या कामगारांना उंदिर पकडण्यासाठी बॅटरी, काठी व अन्य साहीत्याही स्वत:च्या खर्चानेच खरेदी करावे लागत आहे.
या कामगारांच्या वेतनविलंबाबाबत पालिका प्रशासन व ठेकेदारांकडून परस्परविरोधी उत्तरे दिली जात आहे. पालिका प्रशासनाकडून ठेकेदार वेळेवर बिल सादर करत नसल्याने पगार काढण्यास उशिर होत असल्याचे सांगितले जात आहे तर पालिकाच पैसे वेळेवर देत नसल्याचे ठेकेदारांकडून कामगारांना सांगण्यात येत आहे. या टोलवाटोलवीत मूषक नियत्रंणच्या कामगारांवर मात्र उपासमारीची वेळ आली आहे. आज सप्टेंबर महिन्याची ७ तारीख लोटली तरी मूषक नियत्रंणच्या कामगारांना जुलै महिन्याचा पगार मिळालेला नाही. कामगार पगाराबाबत ठेकेदाराला फोन करत असतात, परंतु ठेकेदार आपला फोनही उचलत नसल्याचा संताप कामगारांकडून व्यक्त करण्यात येत आहे. पालिकेत काम करणार्या कंत्राटी कामगारांमध्ये केवळ मूषकच्याच कामगारांचा पगार दोन ते तीन महिने विलंबाने होत असताना महापालिकेतील नगरसेवक, कामगार संघटनांचे पदाधिकारी त्याकडे लक्ष देत नसल्याचे कामगारांकडून सांगण्यात येत आहे.
*****************
महापालिका प्रशासन व ठेकेदार मूषक नियत्रंणच्या कामगारांचे गेल्या काही वर्षापासून आर्थिक शोषण करत आहे. पालिकेच्या सफाई विभागात अनेक कामगारांना काम न करता वेतन मिळत असल्याचे नेरूळ नोडमध्ये आम्ही जवळून पाहत आहोत. या सफाई कामगारांना आम्ही गेल्या १२-१५ वर्षात कधी रस्त्यावर झाडू मारताना पाहिले नाही. पण पालिकेच्या कागदावर याची सफाई कामगार म्हणून नोंद आहे व ते कोठे झाडू मारतात, याचीही कागदोपत्री नोंद आहे. पण त्यांना रस्त्यावर झाडू मारताना स्थानिक जनतेने कधीही पाहिलेले नाही. जे सकाळपासून पहाटेपर्यत २४ तास दोन सत्रामध्ये प्रामाणिकपणे काम करतात, त्यांचे वेतन विलंबाने होते. पण राजकारण्यांच्या कार्यालयात बसून त्यांची कामे करणार्या सफाई कामगारांना रस्त्यावर झाडू न मारताही वेतन मिळत आहे. प्रामाणिकपणे काम करणार्या मूषक नियत्रंणच्या कामगारांचा पालिका प्रशासनाने व ठेकेदाराने तळतळाट घेणे थांबवावे.
– संदीप खांडगेपाटील
पत्रकार व सामाजिक कार्यकर्ता