राष्ट्रवादी युवकचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते-पाटील यांचे प्रतिपादन
नवी मुंबई ; देशात लोकसभा निवडणुकीत मोदी लाट निर्माण झाल्याने केंद्र आणि राज्यात सत्तांतर झाले. सत्तेवर आल्यानंतर मागील साडेचार वर्षात मोदी सरकारचा खरा चेहरा समोर आला आहे. मोदी लाटेला मोडून काढण्याचे पहिले काम नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत लोकनेते गणेश नाईक यांनी केले. जनतेचा विश्वास आणि दूरदृष्टी विचारांचे नेते म्हणून ओळख असणारे लोकनेते गणेश नाईक यांनी नवी मुंबईला घडविण्याचे काम मागील २५ वर्षात यशस्वीपणे केले आहे. त्यामुळेच नवी मुंबईचे नाव देशात झळकले आहे. लोकनेते गणेश नाईक यांचा नवी मुंबई विकासाचा पॅटर्न आता सर्वत्र राबविणार असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी युवकचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष संग्राम कोते-पाटील यांनी केले. आगामी कालावधीत होणार्या लोकसभा निवडणुका जिंकण्यासाठी कार्यकर्त्यांनी लोकांपर्यंत पोहोचावे आणि नवी मुंबईकर जनतेसाठी केलेली कामे त्यांच्यासमोर मांडावीत, असे आवाहन देखील त्यांनी कार्यकर्त्यांना केले. रविवार ९ सप्टेंबर रोजी कोपरखैरणे येथे आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रवादी युवकच्या आढावा बैठकीत कोते-पाटील यांनी जिल्हा आणि तालुकास्तरीय प्रमुख पदाधिकार्यांशी संवाद साधला.
या आढावा बैठकीला राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस डॉ.संजीव गणेश नाईक, ऐरोलीचे आमदार संदीप नाईक, राष्ट्रवादीचे निरीक्षक सुरेश चव्हाण, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अनंत सुतार, नवी मुंबईचे महापौर जयवंत सुतार, स्थायी समितीचे सभापती सुरेश कुलकर्णी, सभागृह नेते रविंद्र इथापे, राष्ट्रवादी युवकचे जिल्हाध्यक्ष सुरज पाटील, महिला जिल्हाअध्यक्षा माधुरी सुतार, राष्ट्रवादी अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष जब्बार खान, सेवादलाचे अध्यक्ष दिनेश पारख, परिवहनचे माजी सभापती भालचंद्र नलावडे, समाजसेवक चंदू पाटील उपस्थित होते.
कार्यकर्त्यांनी जीव ओतून मेहनत घेतली. लोकनेते नाईक यांच्यावर नवी मुंबईकरांनी विश्वास दाखवत त्यांच्या हाती पुन्हा पालिकेची सत्ता दिली आहे. आगामी कालावधीतील निवडणुका पाहता कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरदचंद्र पवार आणि लोकनेते गणेश नाईक यांचे विचार, व्हिजन त्याचबरोबर आपल्या लोकप्रतिनिधींनी केलेली कामे जनतेसमोर पोहोचवावी, असे आवाहन राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस डॉ. संजीव नाईक यांनी केले. खोटी आश्वासने देणार्या भाजपा सरकारला त्यांची जागा दाखविण्याची आता योग्य वेळ आली आहे, असे सांगत राष्ट्रवादीच्या सर्व सेलच्या पदाधिकार्यांनी आत्तापासूनच आपल्या प्रभागातून बांधणी करुन संपर्क वाढविण्याचे कार्यकर्त्यांना सूचित केले.
एक माणूस एकदा फसतो पुन्हा पुन्हा नाही, असे सांगत फसव्या सरकारला घरचा आहेर जनता नक्की देईल, असा विश्वास आ.संदीप नाईक यांनी व्यक्त केला. नवी मुंबईकरांनी लोकनेते नाईक यांच्यावर २० वर्षात टाकलेला विश्वास त्यांनी शहराच्या नियोजनबध्द विकासातून कसा सार्थ ठरविला आहे, हे त्यांनाच नाही तर संपूर्ण देशाला आता कळलेले आहे. शहराला मिळालेले विविध राष्ट्रीय पुरस्कार ही याची पोचपावती आहे. नवी मुंबईच्या विकासाचे मॉडेल जनतेपयर्ंत पोहोचवा आणि जनतेचा विश्वास प्राप्त करा, असे आवाहन आमदार नाईक यांनी केले.
हे सरकार फेकू सरकार आहे. हे आता जनतेला कळले आहे. जनतेला आता बदल पाहिजे त्यामुळे कार्यकर्त्यांनी अब की बार आपले सरकार, असा प्रचार सुरु करावा. असे सांगून जनतेच्या समस्या सोडविण्याचे आवाहन राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अनंत सुतार यांनी केले. या शहराचा विकास पालिका आयुक्त असताना आपण केला असून त्याचे श्रेय राष्ट्रवादी घेत असल्याचा टाहो शनिवारी झालेल्या रोजगार मेळाव्यात शिवसेनेचे नेते विजय नाहटा यांनी फोडला. नवी मुंबईचा विकास नाहटांनी केला आहे. असे असेल तर मुंबईचा विकास उध्दव ठाकरेंनी केला की मुंबईच्या पालिका आयुक्तांनी केला हे सांगावे? असा खडा सवाल करीत नहाटांचा समाचार घेतला.
महिला अध्यक्षा माधुरी सुतार मार्गदर्शन करताना म्हणाल्या की, मागील अपयशाने खचून न जाता राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्या पुन्हा जोमाने नवी मुंबईत सक्रीय झाल्या आहेत. मोदी सरकारने सत्तेवर येण्यासाठी दिलेली आश्वासने कुठे गेली? ही विचारण्याची जबाबदारी विरोधक म्हणून आपली आणि जनतेची आहे. महिलांवरील वाढते अत्याचार, बेताल वक्तव्य करणारे त्यांचे आमदार, मंत्री आणि पदाधिकारी हे पाहता भाजपा हा संस्कृती नसलेला पक्ष असल्याची टीका त्यांनी केली. आगामी कालावधीत राष्ट्रवादीच्या महिला कार्यकारिणीचे बळ वाढवून लोकसभा निवडणुकीत सत्तांतर करुन दाखवू, असा विश्वास महिला पदाधिकार्यांच्यावतीने मान्यवरांना दिला.
नवी मुंबईचे महापौर जयवंत सुतार म्हणाले की, प्रकल्पग्रस्तांची घरे कायम अधिकृत व्हावी ही लोकनेते गणेश नाईक यांची पोटतिडकीची मागणी काही द्वेषींनी चुकीच्या पध्दतीने प्रकल्पग्रस्तांपुढे मांडली आहे. जर ठाण्यात सत्तेवर असणारे क्लस्टरचे स्वागत करतात तर मग नवी मुंबईत वेगळी भूमिका का घेतात? ही त्यांची दुटप्पी भूमिका असून त्याचे सत्य आता जनतेसमोर आले आहे. या शहराची जडणघडण करताना लोकनेते गणेश नाईक, डॉ.संजीव नाईक, आ.संदीप नाईक यांनी दिलेले योगदान नव्या पिढीपर्यंत पोहोचवा, असे आवाहन महापौरांनी केले.
राष्ट्रवादी युवकचे सुरज पाटील यांनी पेट्रोल दरवाढ, महागाई, वाढती बेरोजगारी, महिला वरील अत्याचार, जातीअंतर्गत निर्माण केला जाणारा कलह या सरकारच्या कालावधीत घडत असल्याने एक चूक जनतेला महाग पडली असल्याचे सांगितले. युवकांची भूमिका ही महत्त्वाची असून शरदचंद्र पवार, खा.सुप्रिया सुळे, लोकनेते गणेश नाईक यांनी केलेले जीवाचे रान नव्या तरुणांपुढे मांडण्याचे आवाहन जुन्या कार्यकर्त्यांना केले. आपला नेता कसा आहे, त्याचे व्हिजन कसे यशस्वी,हे जनतेपर्यंत पोहोचवून खोटे बोलणार्यांना राष्ट्रवादीचे कार्यकर्ते त्यांची जागा दाखवतील, असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला.
चौकट
१ लाख युवकांची मंत्रालयावर धडक
दोन कोटी युवकांना रोजगार देऊ, असे सांगणार्या सत्ताधार्यांनी एक लाख युवकांना तरी रोजगार दिला का? हे पाहावे. राज्यातील उद्योगधंदे बंद पडत असून बेरोजगारी वाढत आहे. सेवा परीक्षेच्या एक लाख जागा आजही रिक्त आहेत. परंतु सरकार त्या जाणीवपूर्वक भरत नाही. त्यामुळे या सरकारचा युवकांकडून निषेध करण्यात येणार असून त्यानुसार येत्या नोव्हेंबर महिन्यात राज्यातील प्रत्येक जिल्हयातील तरुणांना एकत्र करुन एक लाख युवकांचा महामोर्चा मंत्रालयावर काढणार असल्याचे युवकचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते-पाटील यांनी सांगितले.