* भारत बंदला विविध राजकीय पक्षांचा पाठिंबा * शांततामय मार्गाने भारत बंद यशस्वी करा!
मुंबई : पेट्रोल, डिझेल व एलपीजी गॅसच्या दरांमध्ये सातत्याने अवास्तव आणि अन्याय्य दरवाढ होत असल्याच्या निषेधार्थ काँग्रेस पक्षाने उद्या १० सप्टेंबर रोजी भारत बंद पुकारला आहे. राज्यातील विविध राजकीय पक्षांनी या बंदला पाठिंबा जाहीर केला आहे. जनतेने मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी व्हावे व आंदोलन यशस्वी करावे असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केले आहे.
गांधीभवन येथे पत्रकारपरिषदेला संबोधित करताना खा. चव्हाण म्हणाले की, २०१४ मध्ये आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत सुमारे ११० डॉलर्स प्रती बॅरल होती तेव्हा मुंबई पेट्रोलचा दर ८० रूपये तर डिझेलचा दर साधारणतः ६४ रूपये प्रती लीटर होता. आज आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत सुमारे ८० डॉलर्स प्रती बॅरल म्हणजेच २०१४ च्या तुलनेत ३० डॉलर्सने कमी आहे. तरीही आज मुंबईत पेट्रोलचे दर ८७.७७ रूपये आणि डिझेलचे दर ७६.९६ रूपये एवढे आहेत. सरकार इंधनावर कर आणि अधिभार लावून सर्वसामान्य जनतेची लूट करित आहे. इंधनदरवाढीमुळे वाढलेल्या महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. सरकारने तात्काळ पेट्रोल, डिझेल जीएसटीच्या कक्षेत आणावे व सर्वसामान्यांना दिलासा द्यावा.
काँग्रेस पक्षाने पुकारलेल्या भारत बंदला राष्ट्रवादी काँग्रेस, शेकाप, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, डावे पक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना, समाजवादी पार्टी, आ.प्रा.जोगेंद्र कवाडे यांच्या नेतृत्वाखालील पीपल्स रिपब्लिकन पार्टी, राजेंद्र गवई यांच्या नेतृत्वाखालील रिपब्लिकन पार्टी या पक्षांनी जाहीर पाठिंबा दिला आहे.
राज्यातील काँग्रेस पक्षाचे सर्व प्रमुख नेते या आंदोलनात सहभागी होणार आहेत. प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण मुंबई येथे, साता-यात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अहमदनगरमध्ये विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, नागपूरमध्ये अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचटिणीस मुकुल वासनिक, नाशिकमध्ये माजी मंत्री आ. बाळासाहेब थोरात, यवतमाळमध्ये माणिकराव ठाकरे, कोल्हापूरात आ. सतेज पाटील, पी.एन. पाटील जयवंत आवळे व प्रकाश आवाडे, ठाणे शहरात माजी मंत्री नसीम खान, चंद्रपूरमध्ये विजय वडेट्टीवार, नांदेडमध्ये आ. डी. पी. सावंत व आ. अमर राजूरकर, लातूरमध्ये आ. अमित देशमुख, उस्मानाबादमध्ये आ.बस्वराज पाटील, भंडा-यात नाना पटोले व सेवक वाघये, जालन्यात तुकाराम रेंगे पाटील, सोलापूरात आ. प्रणिती शिंदे, सिध्दराम म्हेत्रे व दिलीप माने, सांगलीत आ. विश्वजीत कदम व विशाल पाटील, गोंदियात आ. गोपाल अग्रवाल, पालघरमध्ये खा. हुसेन दलवाई, रायगडमध्ये आ. भाई जगताप, बुलढाण्यात आ. हर्षवर्धन सपकाळ, वाशिम अनंतराव देशमुख व आ. अमित झनक, बीड मध्ये अशोक पाटील, अकोल्यात वसंत पुरके, जळगावात उल्हास पाटील आणि शिरीष चौधरी, नंदूरबारमध्ये आ. शरद रणपिसे, वर्धा आ. रणजित कांबळे, अमरावतीत आ. यशोमती ठाकूर, औरंगाबादेत सचिन सावंत, रत्नागिरी माणिक जगताप, हिंगोलीत आ. संतोष टारफे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन होणार आहे. तसेच अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव व महाराष्ट्राचे सह प्रभारी आशिष दुआ नागरपूर येथे, सोनल पटेल पुणे येथे, बी. एम. संदीप रायगड येथे, वामशी रेड्डी नाशिक येथे व संपतकुमार औरंगाबाद येथे या आंदोलनात सहभागी होणार आहेत.
हे आंदोलन नागरिकांना दिलासा देण्यासाठी आहे. त्यामुळे या आंदोलनात जनतेचे, व्यापारी बांधवांचे, सार्वजनिक मालमत्तेचे कोणतेही नुकसान होणार नाही, तसेच गणेशोत्सवासाठी कोकणात जाणा-या भाविकांना त्रास होणार नाही याची संपूर्ण दक्षता काँग्रेस कार्यकर्त्यांनी घ्यावी. आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे आणि ते शांततापूर्ण मार्गाने यशस्वी करावे असे आवाहन काँग्रेस प्रदेशाध्यांनी केले.