कामिनी पेडणेकर
नवी मुंबई : गेल्या काही दिवसापासून सातत्याने पेट्रोल व डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ नवी मुंबई शिवसेनेकडून सायन-पनवेल महामार्गानजीकच्या नेरूळ एलपी येथील पेट्रोलपंपावर जावून निदर्शने करण्यात आली व पेट्रोल दरवाढीच्या विरोधात घोषणाबाजीही करण्यात आली.
शिवसेनेचे नवी मुंबई जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे यांच्या नेतृत्वाखाली ही निदर्शने करण्यात आली. यामध्ये शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख दिलीप घोडेकर, शहरप्रमुख विजय माने, उपशहरप्रमुख गणेश घाग, विभागप्रमुख रतन मांडवे, शिवाजी महाडीक, नगरसेवक रंगनाथ आवटी, सुतार, माजी नगरसेवक सतीश रामाणे, अरूण गुरव, परिवहन समिती सदस्य समीर बागवान, उपविभागप्रमुख प्रल्हाद पाटील, शाखाप्रमुख अरविंद जाधव, रवी पुजारी, मनोज तांडेल, इमरान नाईक यांच्यासह शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या निदर्शनासोबत नवी मुंबईतील सरसकटपणे सर्वच पेट्रोलपंपावर दरवाढीच्या निषेधाचे फलक लावण्यात आले आहेत.
शिवसेनेकडून तातडीने या निदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सुमारे तासभर चाललेल्या शिवसेनेकडून पेट्रोलपंपावर व पेट्रोलपंपाच्या बाहेरील परिसरात घोषणाबाजीमुळे बघ्याची गर्दी मोठ्या प्रमाणावर जमली होती. शिवसेना इंधन दरवाढीच्या विरोधात असल्यामुळे जनसामान्यांच्या रोषाला कोठेतरी वाचा फुटावी आणि दरवाढीचा गोरगरीबांना किती त्रास होत आहे हे केंद्र सरकारला दाखवून देण्यासाठी आज दरवाढीच्या विरोधात निदर्शने व घोषणाबाजी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती शिवसेनेचे विभागप्रमुख रतन नामदेव मांडवे यांनी दिली.
नेरूळमधील एलपीजवळील पेट्रोलपंप, सीवूड्स येथील हावरे सेंच्युरियन मॉलसमोरील पेट्रोलपंप, नेरूळ सेक्टर सहामधील पेट्रोलपंप, सीवूड्स सेक्टर ४८ येथील पेट्रोलपंप या चारही ठिकाणी शिवसेनेच्या वतीने निदर्शने आणि इंधन दरवाढीच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. सोमवारी बेलापुर, जुईनगर आणि वाशीतील सर्व पेट्रोलपंपावर निदर्शने करण्यात येवून निषेधाचे फलक लावणार असल्याची माहिती महापालिका परिवहन समितीचे सदस्य समीर बागवान यांनी दिली.