नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती आवारातील पाचही मार्केटच्या समस्या जाणून घेण्याकरिता भाजपच्या बेलापुर विधानसभेच्या आमदार सौ. मंदा म्हात्रे यांनी वाशीतील विष्णूदास भावे नाट्यगृहात १६ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता विशेष बैठक आयोजित करण्यात आली आहे.
बेलापुरात भाजप आमदार निवडून आल्यापासून भाजपने मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती आवारातील कांदा बटाटा मार्केट, भाजी मार्केट, फळ मार्केट, किराणा दुकान मार्केट, धान्य मार्केट या पाचही मार्केटवर विशेष लक्ष केंद्रीत केले आहे भाजी मार्केटमधील २८५ गाळ्यांच्या प्रलंबित प्रश्न सोडविण्यास आमदार मंदा म्हात्रे यांना यश आले असून राज्य सरकारने या मार्केटला कृषी क्षेत्राशी संबंधित सर्व उत्पादनाकरिता बहूउद्देशीय मार्केट करण्यास परवानगी दिली आहे. हे मार्केट बंदच पडल्याने येथील कर्जबाजारी झालेल्या व्यापाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. भाजी मार्केट, फळ मार्केट व कांदा बटाटा मार्केटमधील व्यापाऱ्यांना व अन्य घटकांना त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी आमदार मंदा म्हात्रे या सातत्याने मंत्रालयात नेवून संबंधित मंत्र्यांसोबत बैठका करून देत आहेत. बाजार आवारातील व्यापारी, खरेदीदार, शेतकरी, वाहतुकदार, माथाडी, मापाडी, पालावाल महिला, वारणार, बाजार समिती कर्मचारी व अधिकारी यांच्या समस्यांना मंत्रालयीन पातळीवरून न्याय देण्याचा आमदार मंदा म्हात्रे यांनी सातत्याने प्रयत्न केला आहे.
सहकार क्षेत्रातील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या मक्तेदारी शह देवून त्या ठिकाणी कमळ फुलविण्याची भाजपची महत्वाकांक्षी योजना आमदार मंदा म्हात्रेंच्या रूपाने मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील पाचही मार्केटमध्ये पहावयास मिळत आहे. त्यातच काही दिवसापूर्वी माथाडी नेते नरेंद्र पाटील हे भाजपवासी झाल्याने आमदार मंदा म्हात्रे यांच्या मार्केटमधील पायावर नरेंद्र पाटलांच्या माध्यमातून भाजप कळस चढविणार असल्याचे चित्र मार्केटमध्ये निर्माण झाले आहे.
या बैठकीस व्यापारी, व्यापारी संस्था, हॉटेल व्यावसायिक, दुकानदार व अन्य सर्व घटकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन आमदार मंदा म्हात्रे यांनी केले आहे.