कामिनी पेडणेकर
नवी मुंबईः महाराष्ट्र शासन उद्योग विभाग तर्फे वाशी येथील सिडको प्रदर्शन केंद्र मध्ये ८ सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या बाळासाहेब ठाकरे रोजगार मेळाव्याला तरुणाईचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. सुमारे ८ हजार ७५० युवक-युवतींनी मेळाव्यासाठी नोंदणी केली होती. मेळाव्यामध्ये नोंदणी केलेल्या उमेदवारांपैकी ४, ७०७ उमेदवार उपस्थित होते. त्यापैकी ३ हजार ३०६ उमेदवारांच्या मुलाखती होऊन १६०२ तरुण-तरुणींना ऑफर लेटर्स देण्यात आली. या मेळाव्यात तरुणींचा सहभाग लक्षणीय होता.
बाळासाहेब ठाकरे रोजगार मेळाव्याचे उद्घाटन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा ठाणे जिल्हा पालकमंत्री ना. एकनाथ शिंदे यांनी केले. याप्रसंगी राज्याचे उद्योगमंत्री ना. सुभाष देसाई, खासदार राजन १६०२ तरुण-तरुणींना ऑन दि स्पॉट नोकरी बाळासाहेब ठाकरे रोजगार मेळाव्याला तरुणाईचा उदंड प्रतिसाद विचारे, आमदार सौ. मंदाताई म्हात्रे, आमदार संदीप नाईक, ‘मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्बांधणी मंडळ’चे सभापती विजय नाहटा, ठाणे जिल्हाधिकारी आर. जे. नार्वेकर, नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन., ‘एमआयडीसी’चे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय सेठी, राज्य उद्योग संचालनालय’चे विकास आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे, विजय शेट्टी, शिवसेना नवी मुंबई जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे आणि द्वारकानाथ भोईर आदि मान्यवर उपस्थित होते.
बाळासाहेब ठाकरे रोजगार मेळाव्यामध्ये नवी मुंबई, ठाणे, मुंबई परिसरातील तरुण आणि तरुणी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मेळाव्यात तसेच १७५ कंपन्यांनी सहभाग घेतला होता. ‘कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीज’ने (सीआयआय) या मेळाव्यासाठी सहकार्य केले होते. मेळाव्यात प्रत्येक स्टॉलवर मुलाखत देण्यासाठी तरुण-तरुणींची एकच झुंबड उडाली होती. ऑनलाईन नोंदणीमुळे रोजगार मेळावा शिस्तीत पार पडला.
मेळाव्यात ४, ७०७ इतक्या मोठ्या संख्येने तरुण-तरुणी जमल्यानंतरही कोणताही गडगड गोंधळ झाला नाही. दहावी-बारावी, पदवीधर, आयटीआय आणि अभियंत्रिकी पदवी असे चार विभाग केल्यामुळे तरुण-तरुणींना मेळाव्यात पसंतीची कंपनी निवडण्यास चांगला वाव मिळाला.
एकीकडे देशाची अर्थव्यवस्था झपाट्याने वाढत असली असे सांगितले जाते. मात्र, दुसरीकडे नोकर्या कमी होत आहेत. देशात ३ कोटीहून अधिक तरुण-तरुणी बेरोजगार आहेत. ३० लाखाहून अधिक पदवीधर दरवर्षी नोकरी शोधण्यासाठी बाहेर पडतात. ‘स्थानीय लोकाधिकार समिती’ने भूमिपुत्रांना नोकरी देण्याची चळवळ सुरू केली आणि आता रोजगार मेळाव्याच्या निमित्ताने नामांकित कंपन्या आणि उमेदवार समोरासमोर येऊन रोजगार मेळावे यशस्वी करीत आहेत, असे यावेळी ना. एकनाथ शिंदे यांनी नमूद केले.
महाराष्ट्र शासन उद्योग विभाग तर्फे ठाणे आणि कल्याण मध्ये देखील बाळासाहेब ठाकरे रोजगार मेळावा आयोजित करण्यात यावा, अशी सूचनाही ना. एकनाथ शिंदे यांनी केली. शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब यांच्या प्रेरणेतूनच मराठी तरुण-तरुणींना नोकर्या देणारी चळवळ सुरू झाली. एअर इंडिया, रेल्वे, मोठ्या बहुराष्ट्रीय कंपन्या अशा ठिकाणी नोकर्या मिळणे सुरु झाले. त्यामुळे रोजगार मेळाव्यास बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यात आले, असे ना. सुभाष देसाई यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्र राज्यात गुंतवणूक वाढावी आणि तरुण-तरुणींना रोजगार उपलब्ध व्हावेत, या उद्देशाने रोजगार मेळावा आयोजित करण्यात येत असून, पहिला बाळासाहेब ठाकरे रोजगार मेळावा जून-२०१८ मध्ये पुणे येथे झाला. या रोजगार मेळाव्यात २७०० तरुण-तरुणींना नोकरी मिळाली. राज्यात गुंतवणूक वाढत असून नोकरीच्या संधी
देखील गुंतवणूकीमुळे वाढणार आहेत. मेळाव्यात निवड न झालेल्या तरुण-तरुणींच्या पुढील काही दिवसांमध्ये उद्योग विभाग, सीआयआय कार्यालयात मुलाखती घेऊन त्यांना देखील उचित कंपन्यांत नोकरी मिळेल यासाठी मार्गदर्शन केले जाणार आहे, अशी माहिती ना. सुभाष देसाई यांनी दिली.
मेळाव्यात नोकरी न मिळालेल्या नवी मुंबईतील तरुण-तरुणींसाठी मुलाखतीची व्यवस्था वाशी येथील आयसीएल कॉलेजमध्ये करण्यात येणार आहे. सर्वच तरुण-तरणींना नोकरी मिळावी यासाठी पाठपुरावा करण्यात येणार आहे, असे ना. सुभाष देसाई यांनी यावेळी सांगितले. रोजगार इच्छुकांनी संकुचित वृत्ती सोडून आणि केवळ तात्कालिक विचार न करण्याची भूमिका ठेवण्याची गरज आहे.पुस्तकी ज्ञानाला कौशल्याची जोड नसेल तर शिक्षणाला काही अर्थ नाही. देशातच नव्हे तर जगभर विविध काळांत, विविध कारणांमुळे नेहमीच बेरोजगारीची समस्या राहिली आहे. पण, बेरोजगारवर मात करण्याची क्षमता राज्यातील युवक-युवतींमध्ये आहे, असे मत यावेळी ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी व्यक्त केले.
युवक-युवतींनी तंत्रज्ञानाचा अवलंब तर करावा शिवाय संवाद कौशल्य आत्मसात करुन विविध कौशल्येही अंगी बाणवावी, असे आवाहनही ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी केले. ईझ ऑफ डूइंग बिझिनेसमुळे खूप सकारात्मक परिणाम झाले आहेत, असे प्रारंभी विकास आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांनी सांगितले. मेळाव्याचे सूत्रसंचालन निवेदिका रेशमा आवटे यांनी तर आभार प्रदर्शन कोकण विभाग उद्योग सहसंचालक शैलश राजपूत यांनी केले. उद्घाटनानंतर ना. एकनाथ शिंदे, उद्योगमंत्री ना सुभाष देसाई यांनी मेळाव्यातील विविध कंपन्यांच्या स्टॉल्सना भेट देऊन युवक-युवतींशी संवादही साधला.