नवी मुंबई : पेट्रोल, डिझेल, गॅसच्या गगणाला भिडलेल्या किंमतीविरोधात विरोधी पक्षांनी पुकारलेल्या बंदला सोमवारी उत्फुर्त प्रतिसाद लाभला. नवी मुंबई, ठाणे, मिरा-भाईंदरसह मुंबईत आणि राज्यभरात या जिव्हाळयाच्या प्रश्नावर नागरिक बंदमध्ये सहभागी झाले होते.
नवी मुंबईत भुलथापा देणार्या मोदी सरकारचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने प्रदेश सरचिटणीस डॉ संजीव गणेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली लॉंग मार्च काढण्यात आला. मोदी सरकारच्या अपयशाचा निषेध करण्यात आला. राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्षा माधुरी सुतार, युवकअध्यक्ष सुरज पाटील, सेवादल अध्यक्ष दिनेश पारख, पालिकेतील सभागृहनेते रविंद्र इथापे, नगरसेविका शुभांगी पाटील, नगरसेविका उषा भोईर, नगरसेविका नेत्रा शिर्के परिवहन समिती सदस्य राजू शिंदे, तालुकाअध्यक्ष अवतार सिंग बिंद्रा, माजी उपमहापौर अविनाश लाड, संकल्प संजीव नाईक, आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने सहभागी झाले होते. वाशी येथील शिवाजी चौकात कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, मनसे, शेकाप, आरपीआय आदी विरोधी पक्षांच्या नेत्यांनी मोदी सरकारच्या अपयशाचा बुरखा टराटर फाडला तसेच इंधन, गॅसदरवाढी तातडीने मागे घेण्याची मागणी केली. मनसेचे शहर अध्यक्ष गजानन काळे यांच्या नेतृत्वाखाली वाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती येथे व्यापार्यांना आवाहन करून मनसे पदाधिकार्यांनी व्यवहार बंद ठेऊन सत्ताधारी मोदी भाजप सरकारचा निषेध करण्याचे आवाहन केले. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समिती परिसर मनसे कार्यकर्त्यांनी सरकार विरोधात घोषणा देऊन दणाणून सोडला. मोदी सरकार हाय हाय, या सरकारच करायचं काय, खाली डोकं वरती पाय, फेकू मोदीचा निषेध असो निषेध असो असा घोषणा नवी मुंबई मनसैनिकांनी याप्रसंगी दिल्या. व्यापार्यांनी देखील मनसेच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देऊन व्यवहार बंद ठेवला. वाशी सेक्टर -१७ येथील पेट्रोल पंप देखील शहर अध्यक्ष गजानन काळे यांच्या नेतृत्वाखाली मनसे कार्यकर्त्यांनी बंद पडला. यावेळी तिथे पेट्रोल, डीजेल भाववाढीचे फलक मनसे तर्फे लावण्यात आले.
ऐरोली येथील ठाणे बेलापूर महामार्गावर मनसे उपशहर अध्यक्ष निलेश बाणखेले यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको करण्यात आला. यावेळी निलेश बाणखेले, रुपेश कदम, गणेश म्हात्रे, प्रविण घोगरे, दिनकर पागिरे, सचिन निकम, जमीर पटेल, निखिल थोरात, प्रविण फापळे, दशरथ सुरवसे यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल करून अटक व सुटका केली.
अवतरण…
महागाईमुळे महिलांना घर चालविणे कठिण झाले आहे. पेट्रोल, डिझेल किंमतवाढीचा मोदी सरकार रेकॉर्ड करते की काय? अशी भिती आहे. देशात अघोषित आणीबाणीच सुरु आहे.
– डॉ संजीव गणेश नाईक, प्रदेश सरचिटणीस, राष्ट्रवादी कॉंग्रेस
विरोधी पक्षांनी एकोपा टिकवून ठेवावा. २०१९च्या निवडणुकीत देशात सत्तांतर अटळ आहे. मोदी सरकार केवळ वल्गना करणारे सरकार आहे.
– महापौर जयवंत सुतार
बंदमधून सर्वसामान्यांचा आक्रोश प्रगट झाला आहे. फक्त घोषणा करायची, काम करायचे नाही हाच भाजपाचा कार्यक्रम आहे. शिवसेनेची भुमिका तेरी भी चूप मेरी भी चूप अशी मिळून खाण्याची आहे. हे सरकार अरबी समुद्रात बुडवा.
– अनंत सुतार, जिल्हाध्यक्ष नवी मुंबई राष्ट्रवादी कॉंग्रेस
बंद निमित्ताने सरकारविरोधातील जनतेचा उद्रेक बाहेर पडला आहे. विरोधी पक्षांनी एकत्रित प्रयत्न करुन भुलथापा देणारे सरकार उलथवून टाकावे.
– माजी महापौर सुधाकर सोनावणे
नोटाबंदी हा मोदी सरकारचा सर्वात मोठा भ्रष्टाचार होता. आश्वासन दिले पण महागाई कमी केली नाही. आता कामे केल्याच्या कितीही जाहिराती केल्या तरी जनतेला सरकारचे खरे रुप कळले आहे.
– दशरथ भगत, माजी जिल्हाध्यक्ष नवी मुंबई कॉंग्रेस
सत्तेवर आल्यावर सहा महिन्यात देश बदलण्याची भाषा मोदी सरकारने केली होती. मागील साडेचार वर्षात देशाची वाट लावली. हे फेकू सरकार आहे. नवी मुंबईत विरोधक एकत्र राहिले तर भाजपाचे अस्तित्व उरणार नाही.
– संतोष शेटटी, प्रदेशनेते कॉंग्रेस
मोदी सरकारला जनता कंटाळली आहे. त्यामुळे बंदला मोठे समर्थन मिळाले. घराघरात मोदी सरकारचे अपयश पोहोचवा.
– गजानन काळे, मनसेनेते
मोदी सरकार धर्माधर्मात भांडणे लावण्याचे काम करीत असून त्या माध्यमातून आपले अपयश झाकत आहे. हे सरकार सर्व आघाडयांवर अपयशी ठरले आहे.
-जब्बार खान, अल्पसंख्याक सेल अध्यक्ष, राष्ट्रवादी