कामिनी पेडणेकर
** या कार्यक्रमास महापालिका अधिकारी व कर्मचार्यांना आर्वजून उपस्थित राहण्याचा मनोज मेहेरांचा आग्रह **
नवी मुंबई : सारसोळे गावातील अर्ंतगत रस्त्यांची गणेशोत्सवापूर्वी डागडूजी करून खड्डे बुजविण्याची मागणी ‘ब’ प्रभाग समितीच्या बैठकीत करूनही पालिका प्रशासनाने खड्डे बुजविले नाहीत. आता त्याच खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करण्याची लेखी निवेदनातून नेरूळ विभाग कार्यालयाकडे परवानगीची मागणी करताना ‘ब’ प्रभाग समिती सदस्य मनोज मेहेर यांनी पालिका अधिकारी व कर्मचार्यांना त्या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे निमत्रंणही दिले आहे.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई महापालिका कार्यक्षेत्रातील रस्त्यावर खड्डे बुजविण्याचे काम युध्दपातळीवर सुरू आहे.परंतु सारसोळे गाव नवी मुंबई कार्यक्षेत्रात नसावे असा आमच्या सारसोळे ग्रामस्थांचा समज झालेला आहे. गणेशोत्सव आता अवघ्या ४८ तासावर आलेला असताना सारसोळे गावातील अर्ंतगत रस्त्यावर खड्डे ‘जैसे थे’च आहेत. त्यामुळे पर्यावरणाच्या रक्षणासाठी व वसुंधरेच्या संतुलनासाठी आम्ही सारसोळे गावातील अर्ंतगत रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यावर सारसोळे ग्रामस्थांच्या वतीने वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करत असल्याचे मनोज मेहेर यांनी लेखी निवेदनातून पालिका प्रशासनास कळविले आहे.
या परिसराच्या विकासाची जबाबदारी असणार्या महापालिका प्रशासनाचीही या सोहळ्यात उपस्थिती असावी यासाठी आपणासही निमंत्रित करणार आहोत. आपण रस्त्यावरील खडड्डे नसेल बुजवायचे तर नका बुजवू, आम्हा सारसोळे ग्रामस्थांना गेल्या अनेक वषार्र्पासून समस्यांसोबत वावरायची सवयच अंगवळणी पडलेली आहे. आम्ही लवकरच सारसोळेतील अर्ंतगत रस्त्यावर खड्डे पडलेल्या ठिकाणी वृक्षारोपण करणार आहोत. महापालिका प्रशासनाचे सारसोळे गावावर असलेले प्रेम महाराष्ट्राला दिसावे म्हणून आम्ही या कार्यक्रमाचे फेसबुक लाईव्ह, व्हिडिओ चित्रिकरण, वृत्तवाहिन्यांचे प्रतिनिधी, यूट्यूब वाहिन्यांचे प्रतिनिधी सर्वांना निमंत्रण देणार आहोत. आपणही यात सहभागी व्हावे अशी आमची इच्छा आहे. गणेशोत्सव कालावधीत हा कार्यक्रम आम्ही घेणार आहोत. आपणास याचे फोनवरून अथवा आपले कार्यालय आमच्या सारसोळे गावापासून हाकेच्या अंतरावरच असल्याने कार्यक्रमाच्या अगोदर काही मिनिटे आपणास प्रत्यक्ष येवून निमंत्रण देण्यात येईल, असे मनोज मेहेर यांनी निवेदनात म्हटले आहे.
*****************************
सारसोळे गावातील अर्ंतगत रस्त्याच्या दुर्रावस्थेविषयी पालिका प्रशासनाला वारंवार कळविले आहे. महापालिकेच्या ‘ब’ प्रभाग समितीच्या बैठकीत गणेशोत्सवापूर्वी गावातील अर्ंतगत रस्त्यावरील खड्डे बुजविण्याची मागणीही केली होती. प्रभाग समितीमध्ये केवळ आश्वासने मिळतात. जे बोलतोय, त्याची इतिवृत्तात नोंदही होत नाही. इतिवृत्त हाती आल्यावर भलतेच वाचायला मिळते. गणेशोत्सव २४ तासावर आलेला असताना सारसोळेच्या रस्त्यावरील खड्डे व दुरावस्था कायम आहे. सारसोळेचे ग्रामस्थ आणि सारसोळे गावातील अन्य रहीवाशी यांच्याशी नवी मुंबई महापालिका प्रशासनाला काहीही देणेघेणे राहीले नसल्याने या समस्येकडे नवी मुंबईकरांचे लक्ष वेधण्यासाठी ग्रामस्थांसोबत रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये आपण लवकरच वृक्षारोपण करणार आहोत.
– मनोज यशवंत मेहेर
महापालिका ‘ब’ प्रभाग समिती सदस्य व सारसोळेकर ग्रामस्थ