नवी मुंबई : नवी मुंबईकर नागरिकांना समाधानकारक सेवा पुरविणारी प्रवासी वाहिनी म्हणून ओळखल्या जाणा-या नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमाच्या सेवेत नवीन 30 मिडी बसेस दाखल झाल्या असून कोपरखैरणे सेक्टर 3 येथील बस डेपोमध्ये या मिडी बसेसचे लोकार्पण नवी मुंबईचे महापौर श्री. जयवंत सुतार यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
याप्रसंगी ऐरोली विधानसभा सदस्य आमदार श्री. संदीप नाईक, महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन., स्थायी समितीचे सभापती तथा परिवहन समितीचे पदसिध्द सदस्य श्री. सुरेश कुलकर्णी, सभागृहनेते श्री. रविंद्र इथापे, कार्यक्रमाचे निमंत्रक तथा परिवहन समितीचे सभापती श्री. रामचंद्र तथा आबा दळवी, इ प्रभाग समिती अध्यक्ष श्रीम. लता मढवी, नगरसेवक श्री. निवृत्ती जगताप, परिवहन समिती सदस्य श्री. प्रदिप गवस, श्री. राजु शिंदे, श्री. अब्दुल जब्बार खान, श्री. काशिनाथ पाटील, श्री. राजेंद्र इंगळे, श्री. विरेश सिंग, श्री. सुधीर पवार, श्री. राजेंद्र आव्हाड, श्री. समिर बागवान तसेच महानगरपालिकेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्री. धनराज गरड, परिवहन उपक्रमाचे व्यवस्थापक श्री. शिरीष आरदवाड व मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्री. निलेश नलावडे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमाच्या 82 व्होल्व्हो बसेससह एकूण 452 बसेसच्या ताफ्यामध्ये 30 नवीन मिडी बसेसची भर पडली असून आयशर व्होल्व्हो प्रकारच्या या बसेस सेमी ॲटोमॅटीक स्वरुपाच्या आहेत. यामध्ये ॲटोमॅटीक मॅन्युअल ट्रान्समिशन पध्दतीचा वापर करण्यात आला असून क्लच विरहीत व गिअरचा कमीत कमी वापर करावा लागत असल्याने चालकांसाठी या बस अत्यंत आरामदायी आहेत हे या बसेसचे प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. सध्या 70 विविध मार्गांवरून एन.एम.एम.टी. बससेवा पुरविली जात असून त्यामधील मार्ग क्रमांक 8, 21, 22 अशा छोट्या रस्त्यांवरून मार्गाक्रमण करणा-या एन.एम.एम.टी. बसेसच्या विविध मार्गांवर या मिडी बसेस लाभदायी ठरणार आहेत. या मिडी बसेसमुळे एन.एम.एम.टी. सेवा अधिक सुलभ व सुनियोजित पध्दतीने पुरविणे शक्य होणार असून याव्दारे नागरिकांकरीता अधिक चांगली बससेवा उपलब्ध होणार आहे.