नेरूळ दिनांक.
रवींद्र सावंत
नवी मुंबई : नेरूळ, नवी मुंबई, येथे संस्थापक श्री संतोष शेट्टी यांच्या संकल्पनेतून व नगरसेविका सौ. मीरा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली 27 वर्षांपासून जनसेवा मंडळामार्फत गणेशोत्सव साजरा केला जात असून गेल्या 15 वर्षांपासून चांदीची सुंदरशी मूर्ती कायमस्वरूपी आणण्यात आलेली असून इतर गणेशोत्सवाप्रमाणे गणेश चतुर्थी रोजी प्राणप्रतिष्ठापना करण्यात आलेली आहे, तसेच अनंत चतुर्दशी दिवशी शोभेची मिरवणूक काढण्यात येते व चांदीच्या मूर्तीचे विसर्जन न करता मातीच्या छोट्या मूर्तीला बादलीत ठेवून शास्त्रीय पद्धतीने विरघळवून ते पाणी झाडाला घातले जाते. तसेच चांदीची मूर्ती पुन्हा पुढील वर्षासाठी व्यवस्थित सन्मानपूर्वक ठेवण्यात येते.
मंडळाच्या वतीने विविध उपक्रम दरवर्षी राबवले जातात. उदाहरणार्थ गरजू व गरीब आणि विधवा महिलांच्या मुलांना आर्थिक सहाय्य शैक्षणिक कार्यासाठी केले जाते. तसेच गरजू व्यक्तींना वैद्यकीय मदत उपलब्ध करून दिली जाते. महिलांच्या एकीकरणासाठी हळदी कुंकू कार्यक्रम फार मोठ्या प्रमाणात केला जातो. धार्मिक कार्यक्रमा शिवाय इतर कोणतेही कार्यक्रम याठिकाणी घेतले जात नाहीत, हे या मंडळाचे वैशिष्ट्य आहे. या उत्सवाच्या निमित्ताने मंडप आणि परिसरात स्वच्छतेला प्राधान्य दिले जाते. कोणाकडूनही या गणेशोत्सवासाठी देणगी व वर्गणी मागितली जात नाही. मंडळामार्फत सर्व काही खर्च केला जातो. अशा रीतीने हा आगळावेगळा गणेशोत्सव 28 वर्षे साजरा करण्यात येत आहे. यात विशेषतः संस्थापक श्री संतोष शेट्टी, मार्गदर्शक सौ. मीरा पाटील नगरसेविका, तसेच प्रमुख सल्लागार श्री ज्ञानेश्वर गावडे, अध्यक्ष श्री सत्यवान देसाई, उपाध्यक्ष सुरेन्द्र कुमार कोचर, कार्याध्यक्ष श्री महादेव झणझणे, सचिन दत्तात्रय जाधव.. इत्यादी कार्यकर्त्यांच्या पुढाकाराने सालाबाद प्रमाणे अतिशय उत्साहात कार्यक्रम घेण्यात येत आहेत. उत्कृष्ट सजावट केशव आमीन व सहकारी व्यवस्थितपणे करीत असून भक्तांची या गणेशोत्सवात रिघ लागलेली व गर्दी झालेली दिसून येते.