कामिनी पेडणेकर
नवी मुंबई : महापालिका प्रशासनाकडे रस्त्याच्या दुरावस्थेबाबत लेखी पाठपुरावा करून तसेच पालिका प्रभाग समितीच्या बैठकीत रस्त्यावरील खड्डे याबाबत प्रशासनाचे लक्ष वेधूनही प्रशासन लक्ष देत नव्हते. या पार्श्वभूमीवर महापालिका ‘ब’ प्रभाग समितीचे सदस्य मनोज यशवंत मेहेर यांनी ठाण्याचे माजी पालकमंत्री व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मातब्बर नेते गणेशध नाईक यांच्या वाढदिवसाचा मूहूर्त साधत सारसोळे गावातील कै. बुध्या बाळ्या वैती मार्गावर रस्त्यातील खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करून पालिकेचा निषेध केला.
सारसोळे गावातील अर्ंतगत रस्त्याच्या दुरावस्थेविषयी पालिका ब प्रभाग समिती सदस्य मनोज यशवंत मेहेर यांनी पालिका प्रशासनाकडे सतत लेखी तक्रारी केल्या. प्रभाग समितीच्या बैठकीत याबाबत प्रश्न उपस्थित करत सारसोळे ग्रामस्थांच्या समस्यांकडे लक्ष वेधण्याचा त्यांनी प्रयत्न केला. गणेशोत्सवापूर्वी सारसोळे गावातील अर्ंतगत रस्त्याची डागडूजी करत खड्डे बुजविण्याची मागणीही मनोज मेहेर यांनी केली. पालिका प्रशासनाने रस्त्याची डागडूजी व खड्डे गणेशोत्सवापूर्वी बुजविण्याचे आश्वासन मनोज मेहेर यांना दिले. तथापि गणपती आले व दीड दिवसाचे गणपती गेलेही, मात्र सारसोळे गावातील अर्ंतगत रस्त्याबाबत पालिका प्रशासनाने कार्यवाही केली नाही. १५ सप्टेंबर हा राष्ट्रवादीचे नेते व ठाण्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांचा जन्मदिवस. सारसोळे गावातील अर्ंतगत रस्त्यांच्या खड्डे व दुरावस्थेविषयी पालिका प्रशासनाचा निषेध व्यक्त करण्यासाठी गावातील कै. बुध्या बाळ्या वैती मार्गावर स्थानिक रहीवाशांच्या मदतीने रस्त्यातील खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण केले.
०००००००००००००००००००००००००
सारसोळेचा विकास हाच माझा श्वास
गेल्या अनेक वर्षापासून सारसोळे गाव आणि नेरूळ सेक्टर सहा परिसरातील समस्या सोडविण्यासाठी व तेथील लोकांना सुविधा मिळविण्यासाठी महापालिका, सिडको, पोलीस मुख्यालय, मंत्रालय सर्वत्र मी पाठपुरावा करत आहे. पालिका प्रशासनाकडे प्रभाग समितीच्या बैठकीत व लेखी तक्रारी करून सतत सारसोळे गावाच्या अर्ंतगत डागडूजीकडे गणेशोत्सव आला असतानाही कानाडोळा केला. नवी मुंबईत सर्वत्र खड्डे बुजविण्यात आले. रस्त्याची डागडूजी करण्यात आली. मग आमच्या सारसोळे ग्रामस्थांच्या रस्त्यांकडे कानाडोळा कशासाठी? सारसोळेचे ग्रामस्थ नवी मुंबईत मोडत नाही काय? सारसोळेच्या विकासाकडे लक्ष दिल्यास राजकारण्यांना मनोज मेहेरच्या बदनामीची मोहीम चालविण्याची गरज भासणार नाही. सारसोळेवासियांना मनोज मेहेर काय आहे, ते लहानपासून माहिती आहे. गेल्या दहा वर्षात सारसोळे गावाच्या विकासासाठी धावपळ करणारा मनोज मेहेर ग्रामस्थांनी जवळून पाहिला आहे व इतर कोण कसे आहे तेही आता सारसोळेच्या ग्रामस्थांना समजून चुकले आहे.
– मनोज यशवंत मेहेर
महापालिका ‘ब’ प्रभाग समिती सदस्य