आशिया चषकातील साखळी सामन्यात भारताने पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर ८ गडी राखून विजय मिळवला आहे. पाकिस्तानने विजयासाठी दिलेलं १६३ धावांचं आव्हान भारतीय फलंदाजांनी लिलया पार केलं. भारताकडून कर्णधार रोहित शर्माने अर्धशतकी खेळी केली, त्याला सलामीवीर शिखर धवनने ४६ धावा काढून चांगली साथ दिली. अर्धशतकी खेळी झाल्यानंतर रोहित शर्मा शादाब खानच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत होऊन माघारी परतला. तर फईम अश्रफने शिखर धवनला माघारी धाडलं. यानंतर विजयासाठी आवश्यक असणारं आव्हान अंबाती रायडू आणि दिनेश कार्तिक जोडीने पूर्ण करत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. फईम आणि शादाबचा अपवाद वगळता एकही गोलंदाज आपली छाप पाडू शकला नाही.
त्याआधी भुवनेश्वर कुमार, केदार जाधव आणि जसप्रीत बुमराहने केलेल्या माऱ्यासमोर पाकिस्तानचा संघ अवघ्या १६२ धावांमध्ये कोलमडला. दुबईत सुरु असलेल्या आशिया चषकात हाँग काँगवर मात केल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी सामना खेळणाऱ्या भारतीय संघाने आक्रमक खेळाचं प्रदर्शन केलं. काही ठराविक भागीदाऱ्यांचा अपवाद वगळता पाकिस्तानचा डाव आकार घेऊ शकला नाही. भुवनेश्वर कुमारने नव्या चेंडूवर खेळताना पाकिस्तानला सुरुवातीला दोन धक्के दिले. यानंतर बाबर आझम आणि शोएब मलिक यांनी तिसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी करुन संघाचा डाव सावरला.