अमेरिकेतील क्लीव्हलँड मोटारसायकलचे भारतातील पहिले दालन नवी मुंबईत सुरु
नवी मुंबई : अमेरिकेतील प्रसिद्ध क्लीव्हलँड मोटरसायकल चे भारतात आगमन झाले असून भारतातील पहिले दालन सुरू करण्याचा मान नवी मुंबई शहराला मिळाला आहे. २हजार चौ.फु. असलेले हे दालन वाशी येथे सुरू करण्यात आले. आज माजी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस चे नेते गणेश नाईक यांच्या हस्ते या दालनाचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमास क्लीव्हलँड सायकलवर्क्स इंडिया चे चेअरमन व व्यवस्थापकीय संचालक संग्राम विलासराव पाटील तसेच संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी प्रणव देसाई यांच्यासह कंपनीचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.
क्लीव्हलँड सायकलवर्क् ब्रँड सध्या जगभरात त्याचे उत्पादन विकतो आणि त्याचे वितरण 23 देशांमध्ये केले जाते. क्लीव्हलँडचे चेअरमन व व्यवस्थापकीय संचालक संग्राम विलासराव पाटील यांनी यावेळी सांगितले की, “क्लीव्हलँड सायकलवर्क्स मोटरसायकल संपूर्ण जगभरातील उत्साही लोकांना संपूर्ण बाइकिंग जीवनशैलीचा अनुभव घेता येणार आहे. इतर देशातील तरुणांसाठी ही मोटरसायकल आकर्षणाचा बिंदू आहे. मात्र आता भारतात आणि विशेष म्हणजे नवी मुंबई मध्ये या गाडीचे आगमन झाल्यामुळे संपूर्ण मुंबई भागातील तरुणांना ही मोटरसायकल नक्कीच पसंतीची ठरणार आहे. तसेच ही मोटर सायकल प्रदूषण रोखण्यास मदत करणार आहे. याचे इंजिन आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे. या गाडीची भारतातील किंमत २लाख ४० हजार इतकी असून विविध श्रेणी मध्ये उपलब्ध आहेत अशी माहिती पाटील यांनी दिली . 250-500 सीसी बाइक सर्वात नवीन डीलरशिप रेट्रो-प्रेरित मोटरसायकल – ‘एस् डिलक्स’ आणि ‘मिस्फीट’, क्लीव्हलँड सायकलवर्क्स मोटरसायकलच्या सध्याच्या श्रेणीतील दोन मॉडेल आणि भारतीय ग्राहकांसाठी विविध डिझाइन पर्याय उपलब्ध करण्यात आल्या आहेत. मुंबईमध्ये मुख्यालय असलेल्या ब्रँडची पुण्यात असेंबली करण्यात येणार आहे.