अफगाणिस्तानविरुद्ध झालेल्या सुपर ४ फेरीतील शेवटच्या सामन्यात भारताला विजय मिळवता आला नाही. कागदावर बलाढ्य दिसणाऱ्या भारताला अफगाणिस्तानने बरोबरीत रोखले आणि स्पर्धेचा शेवट गोड केला. २५३ धावांचे आव्हान पार करताना रवींद्र जडेजाने शेवटच्या षटकात मोक्याच्या क्षणी चौकार लगावला. पण विजयी फटका मारताना तो बाद झाला आणि भारताचे सर्व गडी तंबूत परतले. IPLमध्ये आपली छाप उमटवणाऱ्या रशीद खानने दडपणाच्या क्षणी उत्तम गोलंदाजी करत अफगाणिस्तानला मानसिक विजय मिळवून दिला. शतकी खेळी करणाऱ्या मोहम्मद शेहजादला सामनावीर घोषित करण्यात आले.
२५३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताची सुरुवात चांगली झाली. अंबाती रायडू आणि लोकेश राहुल दोघांनी अर्धशतकी खेळी करत ११० धावांची सलामी दिली. रायडू ५७ धावांवर तर राहुल ६० धावांवर बाद झाला. त्यानंतर दिनेश कार्तिकने एका बाजूने खिंड लढवल ४४ धावा केल्या. पण त्याला इतर फलंदाजांची साथ मिळू शकली नाही. महेंद्रसिंग धोनी (८), मनीष पांडे (८), केदार जाधव (१९), दीपक चहर (१२), कुलदीप यादव (९) आणि सिद्धार्थ कौल (०) हे फलंदाज ठराविक अंतराने बाद झाले. अखेर रवींद्र जडेजाने जबाबदारी आपल्या खांद्यावर घेत भारताला विजयासमीप नेले. पण १ धावेची आवश्यकता असताना तो बाद झाला आणि भारताचा डाव संपुष्टात आला.
तत्पूर्वी, सलामीवीर मोहम्मद शेहजादने झळकावलेलं शतक आणि अखेरच्या फळीत अष्टपैलू मोहम्मद नबीने त्याला दिलेली साथ या जोरावर अफगाणिस्तानने भारताला विजयासाठी २५३ धावांचे आव्हान दिले. अफगाणिस्तानने ५० षटकांत ८ गड्यांच्या मोबदल्यात २५२ धावांपर्यंत मजल मारली. नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी घेण्याचा निर्णय मोहम्मद शेहजादने सार्थ ठरवला. शेहजादने एकहाती भारतीय गोलंदाजांवर हल्ला चढवत संघाला झटपट धावा काढून दिल्या. पहिल्या षटकापासून शेहजादने चौकार आणि षटकारांची आतिषबाजी केली. पहिल्या विकेटसाठी शेहजाद आणि जावेद अहमदी यांच्यात ६५ धावांची भागीदारीही झाली. मात्र रविंद्र जाडेजाने अहमदीला माघारी धाडत अफगाणिस्तानची जोडी फोडली.
यानंतर अफगाणिस्तानचे ४ फलंदाज फारशी चमकदार कामगिरी न करता माघारी परतले. मात्र दुसऱ्या बाजूने मोहम्मद शेहजादने बाजू लावून धरत संघाची झुंज सुरु ठेवली. अखेर केदार जाधवने मोहम्मद शेहजादला माघारी धाडत अफगाणिस्तानला आणखी एक धक्का दिला. शेहजादने १२४ धावा ठोकल्या. त्याच्या या खेळीत ११ चौकार आणि ७ षटकारांचा समावेश होता. दुसऱ्या बाजूने मोहम्मद नबीने चांगली फटकेबाजी करत संघाला २०० धावांचा टप्पा ओलांडून दिला. नबीने ५६ चेंडूत ६४ धावांची खेळी केली. भारताकडून रविंद्र जाडेजाने ३ तर कुलदीप यादवने २ बळी घेतले.