आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांची शिष्टमंडळासह जिल्हाधिकारी समवेत बैठक संपन्न
नवी मुंबई:– नवी मुंबई क्षेत्रातील मूळ गावठाणा बरोबरच विस्तारित गावठाणाचेही सिटी सर्वेक्षण व्हावे याकरिता बेलापूरच्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांची नुकतीच ठाणे जिल्हाधिकारी श्री. राजेश नार्वेकर यांजबरोबर बैठक संपन्न झाली. यावेळी त्यांज समवेत खारीकळवा प्रकल्पग्रस्त संस्थेचे अध्यक्ष श्री. मोरेश्वर पाटील, शेतकरी प्रकल्पग्रस्त कृती समितीचे डॉ. राजेश पाटील, अॅड.पी.सी.पाटील, विजय घाटे तसेच उपजिल्हाधिकारी शिवाजी पाटील, विकास पाटील, भूमी अभिलेख जिल्हा अधीक्षक श्री. अनिल माने, उपअधिक्षक अमर ढोकले, नगर भूमापन अधिकारी सुनील वाणी उपस्थित होते. नवी मुंबई महानगरपालिका व सिडको प्राधिकरण क्षेत्रातील गावठाण व विस्तारित गावठाणाचे नगरभूमापन (सिटी सर्व्हे) तातडीने करण्याचे आदेश मुख्यमंत्री सचिवालयातून देण्यात आले असताना महापालिका व सिडको फक्त मूळ गावठाणांचे सिटी सर्व्हे करीत आहेत. मुख्यमंत्री सचिवालयाच्या आदेशानुसार विस्तारित गावठाणांचाही सिटी सर्व्हेक्षण होणे जरुरी आहे. सदर सर्वेक्षण लवकरात लवकर सुरु करण्यात येणेबाबत बेलापूरच्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी ठाणे जिल्हाधिकारी श्री. राजेश नार्वेकर यांना निवेदन दिले. यावेळी जिल्हाधिकारी श्री.राजेश नार्वेकर यांनीही सदरबाबत सकारात्मक पवित्रा घेत येत्या 15 दिवसांत नवी मुंबईतील विस्तारित गावठाणांचे सर्वेक्षण सुरु करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले कि, 4 महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री यांचे मुख्य प्रधान सचिव श्री. प्रवीण परदेशी यांजबरोबर नवी मुंबई क्षेत्रातील मूळ गावठाण व विस्तारित गावठाण यांचे सिटी सर्वेक्षण लवकरात लवकर करणे तसेच प्रकल्पग्रस्तांनी गरजेपोटी बांधलेली घरे नियमित करणेसंदर्भात बैठक पार पडली होती. सदर बैठकीत मूळ गावठाण व विस्तारित गावठाणांचा सिटी सर्व्हे तातडीने करण्याचे आदेश नवी मुंबई महानगरपालिका व सिडको प्राधिकरणास देण्यात आले होते. सदरबाबत त्यांना विशिष्ट मुदतही देण्यात आली होती. परंतु 4 महिने उलटल्यानंतरही महापालिका फक्त मुळ गावठाणांचेच सिटी सर्वेक्षण करीत आहे. मुख्यमंत्री सचिवालयाच्या आदेशानुसार मूळ गावठाणाबरोबरच विस्तारित गावठाणाचेही सर्वेक्षण होणे जरुरी आहे. याकरिता जिल्हाधिकारी यांजकडे वेळ मागण्यात आली होती. त्यांनीही सदरबाबत सकारात्मक निर्णय देत येत्या 15 दिवसांत विस्तारित गावठाणांचे सर्वेक्षण करण्यात येणार असल्याचे सांगितले. नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांचे सर्वच विषय माझे जिव्हाळ्याचे असून त्यांना त्यांच्या हक्काचे घर मिळावे, त्यांनी गरजेपोटी बांधलेली सर्वच घरे नियमित व्हावी, त्यांना सर्व सुखसुविधा मिळाव्या याकरिता नेहमी शासन दरबारी लढणार असल्याचे आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले.