नवी मुंबई:- साडे तीन लाख मतदारसंख्या असलेल्या नवी मुंबईतील बेलापूर मतदारसंघात सुमारे 36हजार मतदार बोगस असल्याचे आढळून आलेले आहे. विशेष म्हणजे एका मतदाराची दोन ते तीन यादींमध्ये नोंदणी असून काही मतदारांनी एकच छायाचित्र वापरून वेगवेगळ्या नावाने नोंद केलेली आहे. या यादीत पश्चिम महाराष्ट्रातील अनेक मतदारांची दुबार व तिबार नोंदणी झाल्याचेही आढळले आहे. नवी मुंबईत एक लाखापेक्षा जास्त माथाडी कामगार राहत असून या मतदारांनी जन्मभूमी व कर्मभूमीत मतदार नोंदणी कायम ठेवली आहे. याच अनुषंगाने बेलापूर विधानसभा क्षेत्रातील सुमारे36 हजार बोगस नावे वगळण्याकरिता बेलापूरच्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री श्री. देवेन्द्रजी फडणवीस तसेच राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्री. अश्विनी कुमार यांना सर्व पुराव्यांसह निवेदन दिले. मुख्यमंत्री महोदयांनीही सदर बाबत चौकशी करून तात्काळ कार्यवाही करण्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांना आदेश दिले असल्याचे आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले.
यावेळी बेलापूरच्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांना विचारले असता त्यांनी सांगितले कि, माझ्या 151 बेलापूर विधानसभा क्षेत्रात मतदारयादींचे माझ्या बी.एल.ए. मार्फत सर्वेक्षण केले असता अनेक मतदार त्यांच्या पत्त्यांवर राहत नसल्याचे तसेच अनेक मतदारांची दुबार व त्रिबार नावे असल्याचे आढळले. सदर सर्वेक्षणाचा अभ्यास केला असता फक्त बेलापूर विधानसभा क्षेत्रात किमान36 हजार बोगस मतदार असल्याचे निदर्शनास येत आहे. हि अत्यंत चिंताजनक बाब असून याबाबत संबंधित यंत्रणेमार्फत काटेकोरपणे याद्यांची फेर तपासणी करून खात्री करणे आवश्यक आहे. त्यामुळे बोगस मतदानाला आळा बसून गैरप्रकार टाळण्यास मदत होईल. माझ्या बी.एल.ए. मार्फत प्रत्यक्ष केलेल्या सर्वेक्षणात दुबार/त्रिबार बोगस मतदारांच्या नावांच्या यादींचे पुरावेच राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री श्री. देवेन्द्रजी फडणवीस व राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्री. अश्विनी कुमार यांच्या माहितीसाठी दिले आहेत. सदर बाबींचा गांभीर्याने विचार करून माझ्या 151 बेलापूर विधानसभा क्षेत्रातील दुबार व त्रिबार असलेली मतदारांची नावे तपासणी करून सध्या सुरु असलेल्या “विशेष पुन:रक्षण कार्यक्रम” अंतर्गत मतदार यादीतून वगळण्यात यावीत याबाबतचे निवेदन देण्यात आले आहे. याबाबत मुख्यमंत्री महोदयांकडूनही पुराव्याआधारे असलेले बेलापूर विधानसभा क्षेत्रातील बोगस नावे वगळण्याबाबत राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्री. अश्विनी कुमार यांना तात्काळ आदेश देण्यात आले आहेत. तसेच सदर निवेदनाची प्रत कोंकण विभागीय आयुक्त डॉ.जगदीश पाटील, उपजिल्हाधिकारी तुषार मठकर व मतदार नोंदणी अधिकारी श्री. नाथाजी सगट यांनाही देण्यात आली आहे. बोगस मतदानाला आळा बसून गैरप्रकार टाळण्यास मदत व्हावी व यापुढील सर्व निवडणुका पारदर्शक व्हाव्यात हा यामागचा मुख्य उद्देश असल्याचे आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले.