नवी मुंबई : दोन ते तीन महिने गाडयांचे पासिंग होत नाही, मनुष्यबळ नसल्याचे कारण सांगितले जाते. आरटीओमधील अशा संथ आणि त्रासदायक कारभाराचा जाब विचारुन आमदार संदीप नाईक यांनी सोमवारी आरटीओ अधिकार्यांना इशारा दिला की कामाची गती वाढवा अन्यथा एक मोठे आंदोलन उभे करावे लागेल.
आमदार संदीप नाईक यांनी अलिकडेच ऐरोली येथे जनसंवाद कार्यक्रम आयोजित केला होता. या जनसंवादात नागरिकांकडून आरटीओ संबंधीची निवेदने मोठया संख्येने प्राप्त झाली होती. ही सर्व निवेदने त्यांनी आरटीओ अधिकार्यांकडे कार्यवाहीसाठी दिली.
आरटीओ अधिकार्यांच्या अकार्यक्षमतेचा फटका सर्वसामान्य वाहतूकदार नागरिकांना बसतो आहे. वाहनांचे पासिंग वेळेवर होत नसल्याने स्कूल बसचालक, रिक्षाचालक, बस, टेम्पो आदी वाहन चालक कमालीचे त्रस्त आहेत. पासिंग न झाल्याने वाहने बंद ठेवावी लागत आहे. कर्जाचे हप्ते, मुलांचे शिक्षण, आजारपणाला पैसा कुठून आणायचा? असा यक्षप्रश्न या सर्वसामान्यांना पडला आहे. या बाबी आमदार नाईक यांनी आरटीओ अधिकार्यांच्या लक्षात आणून दिल्या. मनुष्यबळाची कमतरता असेल तर अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध करुन अथवा आऊटसोर्स करुन कामे जलदगतीने पूर्ण करण्याची सूचना त्यांनी केली. नेरुळच्या रहिवासी भागात सुरु केलेला आरटीओचा टेस्टिंग ट्रॅक त्वरीत अन्यत्र रहिवासी वस्ती नसलेल्या भागात हलवावा, अशी मागणी देखील त्यांनी याप्रसंगी केली. दाटीवाटीच्या रहिवासी वस्तीमधील या टेस्टिंग ट्रॅकमुळे अपघात घडू लागले असून नेरुळच्या रहिवाशांना धोका निर्माण झाल्याची गंभीर बाब त्यांनी आरटीओ अधिकार्यांच्या ध्यानात आणून दिली. सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे सर्वसामान्य व्यक्ती हवालदिल झाला आहे. शहरातील अनधिकृत रिक्षांवर आरटीओचे नियंत्रण नाही. भरमसाठ रिक्षा परवाने दिल्याने आहे त्या रिक्षा चालकांचा धंदा होत नाही तर नवीन रिक्षा चालकांना कुठून व्यवसाय मिळणार, अशी परिस्थिती आहे. धोरण आखताना अभ्यास केला जात नाही, नियोजन नसते, अशी टीका करुन आमदार नाईक यांनी कारभार सुधारा अन्यथा मोठे आंदोलन उभे करावे लागेल, असा इशाराच दिला. आरटीओ संबंधीचे प्रश्न विधीमंडळाच्या येत्या हिवाळी अधिवेशनात मांडणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. आरटीओच्या भेटीप्रसंगी आ. नाईक यांच्यासोबत विविध वाहतूक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.