दै. निर्भीड लेखच्या दिवाळी अंकाचे महापालिका आयुक्त गणेश देशमुख, सिनेअभिनेते शिवाजी साटम यांच्या हस्ते प्रकाशन
पनवेल : आपला परिसर हे एक पर्यावरण आहे. इथे असणारी माणसं, पशू-पक्षी, निसर्ग यांचा परस्परांशी जैविक संबंध आहे. या संबंधाचे मूल्य राखणे व ते त्यांचे संवर्धन करणे हिच पर्यावरण संस्कृती आहे, असे अतिशय मौलिक विवेचन महाराष्ट्राचे लाडके कवी प्रा. अशोक बागवे यांनी केले.
कांतीलाल कडू संपादित दै. निर्भीड लेखच्या दिवाळी विशेष अंकाचे प्रकाशन कळंबोलीतील न्यू सुधागड हायस्कूलच्या सभागृहात पनवेल महापालिका आयुक्त गणेश देशमुख आणि सिनेअभिनेते शिवाजी साटम यांच्या हस्ते शानदार समारंभपूर्वक झाले. त्यावेळी प्रा. बागवे बोलत होते.
आपले अंगण आणि आपला झाडू जर प्रत्येकाने शुद्ध ठेवले तर पर्यावरणाचे संवर्धन आपोआपच होते आणि आरोग्याच्या समस्या दूर होतात. तसेच समाजाचे आरोग्य निकोप राहण्यास मदत होते, असे त्यांनी अनेक मुद्द्यांद्वारे पटवून दिले.
‘निर्भीड लेख’च्या प्रस्तुत दिवाळी अंकात पर्यावरण संबंधित सर्वांगीण मुद्द्यांची शहानिशा करणारे लेख असल्याने येणार्या पिढीसाठी संदर्भ ग्रंथ ठरावा, एवढा हा अंक अमूल्य आहे असे गौरदगार प्रा. यांनी काढले.
या प्रसंगी पनवेल महापालिकेचे आयुक्त गणेश देशमुख, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सतीश पाटील, डॉ. भक्तिकुमार दवे, शिवसेनेचे महानगर संघटक रामदास शेवाळे, महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसच्या पर्यावरण सेलचे अध्यक्ष अशोक मोरे आदींची यथोचित भाषणे झाली. तर वाहतूक कोंडी अडकूनही कार्यक्रमाच्या ओढीने आपुलकीने उपस्थित राहिलेले ज्येष्ठ सिनेअभिनेते शिवाजी साटम यांची प्रा. बागवे यांनी मुलाखत घेतली. सभागृहात तीन तासांहून अधिक काळ आसनस्थ झालेले रसिक मायबाप पोट धरून हसत होते.
व्यासपीठावर शिवसेनेचे सल्लागार बबनदादा पाटील, कॉँग्रेसचे पनवेल शहर अध्यक्ष सुदाम पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष शिवदास कांबळे, सुरदास गोवारी, रामदास पाटील, अरविंद सावळेकर, नगरसेवक गोपाळ भगत, बबनशेठ मुकादम, रविशेठ भगत, शशिकांत बांदोडकर, महादेवशेठ पाटील, रमेश गुडेकर, शांताराम पाटील, भीमसेन माळी, चंदरशेठ घरत, आर. डी. घरत, आल्हाद पाटील, आयटीआयचे प्राचार्य फडतरे, सुधागडचे प्राचार्य इकबाल इनामदार, बांठीयाचे प्राचार्य माळी सर आदी मान्यवरांसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संपादक कांतीलाल कडू यांनी केले. आपल्या खुमासदार शैलीत पराग बालड यांनी सूत्रसंचालन केले.
डॉ. चंदन ठाकूर, प्रशांत गाला, सुरज म्हात्रे, आनंद पाटील, चंद्रकांत शिर्के, मंगल भारवड, महेंद्र विचारे, स्वप्निल म्हात्रे आदींनी मान्यवरांचे स्वागत केले.