‘अनन्या’ फेम ऋतुजा बागवे, ‘अलबत्या’ फेम सनीभूषण मुणगेकर यांची विशेष उपस्थिती
नवी मुंबई : महानगरपालिका कार्यक्षेत्रातील हौशी व नवोदित बालकलाकारांना हक्काचे व्यासपीठ मिळावे व त्याचबरोबर त्यांना राज्यातील विविध भागांतील बाल कलाकारांचा अभिनय प्रत्यक्ष पाहण्याची संधी मिळावी हा कलात्मक उद्देश नजरेसमोर ठेवून नवी मुंबई महानगरपालिका क्रीडा व सांस्कृतिक विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘नवी मुंबई महापौर चषक राज्यस्तरीय बालनाट्य स्पर्धा 2018-19’ ची अंतिम फेरी 2 जानेवारी 2019 रोजी वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात संपन्न होत आहे.
दि.24, 25 व 26 डिसेंबर 2018 रोजी 3 दिवस या स्पर्धेची प्राथमिक फेरी विष्णुदास भावे नाट्यगृह, वाशीयेथे यशस्वीरित्या संपन्न झाली असून यामध्ये महाराष्ट्रातील 8 जिल्ह्यांमधून एकुण 28 बालनाट्य संस्थांनीआपला सहभाग नोंदवित एकाहून एक सरस बालनाटके सादर केली़. सुप्रसिध्द निर्माता- दिग्दर्शक श्री.किरणनाकती आणी अभिनेता श्री.गौरव मालणकर यांनी प्राथमिक फेरीचे परीक्षण केलेले असून त्यांनी 8 बालनाटकांची अंतिम फेरीसाठी निवड केलेली आहे. या बालनाट्यांची अंतिम फेरी 2 जानेवारी रोजी सकाळी 9 वाजल्यापासून विष्णुदास भावे नाट्यगृहात सुरू होणार असून सायं. 7 वा. या बालनाट्य स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ महापौर श्री.जयवंत सुतार यांच्या शुभहस्ते इतर मान्यवर अतिथींच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.
याप्रसंगी सुप्रसिध्द अभिनेत्री, ‘अनन्या’ फेम ऋतुजा बागवे यांची बालकलावंतांचे कौतुक करण्यासाठी विशेष उपस्थित असणार आहे. तसेच ‘अलबत्या गलबत्या’ नाटकातील अलबत्याची भूमिका करणारा अभिनेता सनीभूषण मुणगेकर आणि या नाटकाचे निर्माते श्री. राहुल भंडारे यांचीही प्रमुख उपस्थिती असणार आहे.
अंतिम फेरीकरीता सृजन प्रतिष्ठान, शहापूर यांचे ‘ड्रायव्हर’, रंगशारदा कलामंच, खोपोली यांचे ‘जंतर मंतर पोरं बिलंदर’, सेक्रेड हार्ट स्कूल, वरप- कल्याण यांचे ‘हनुमान’, आर्टिस्ट प्लॅनेट, ऐरोली यांचे ‘मोगलीच्या जंगलात मोटू पतलू’, निष्ठा सामाजिक संस्था, वाशी यांचे ‘विक्रम वेताळ आणि जादूगार’, शिवरणभूमी प्रशांत प्रतिष्ठान, ऐरोलीचे – ‘माकडचाळे’, संदेश विद्यालय, विक्रोळीचे ‘बिंग ग्रीन’ आणि समृध्दीसांस्कृतिक कलामंच, ठाणेचे ‘प्रोफेसर मायकल फेरेडे’ ही 8 बालनाट्ये पात्र ठरलेली आहेत. अंतिम फेरीसाठी निवडलेली ही आठ बालनाट्ये दि.02 जानेवारी 2019 रोजी सकाळी 9 ते सायं. 6.30 या वेळेत विष्णुदास भावेनाट्यगृह, वाशी येथे एकेक करून दिवसभर आपले बालनाट्य सादरीकरण करतील.
या सर्व बालनाट्यातून नवी मुंबईतील नाट्य चळवळीला गती लाभणार असून नवी मुंबई महापौरचषक राज्यस्तरीय बालनाट्य स्पर्धा 2018-19 च्या अंतिम फेरीत पोहचलेल्या बालनाट्यातील कलावंतांचे कौतुक करण्यासाठी नवी मुंबईतील जास्तीत जास्त मुलांनी आपल्या पालकांसमवेत विष्णुदास भावे नाट्यगृह, वाशी येथे मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम समितीचे सभापती श्री. मुनवर पटेल यांच्या वतीने करण्यात येत आहे.