कॉंग्रेस शिष्टमंडळाने घेतली पोलीस महासंचालकांची भेट
मुंबई : ९ जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोलापूर दौर्यावेळी युवक कॉंग्रेस व एनएसयुआयच्या कार्यकर्त्यांना मोदींच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवले म्हणून पोलिसांनी आमानुषपणे मारहाण केली. ही अमानवीय व बेकायदेशीर कृती करणार्या पोलिसांचे तात्काळ निलंबन करून सर्व दोषींवर कारवाई अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांच्याकडे केली आहे.
यासंदर्भात महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीच्या वरिष्ठ पदाधिकार्यांच्या शिष्टमंडळाने कॉंग्रेस सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांच्या नेतृत्वात आज राज्याचे पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांची भेट घेऊन निवेदन दिले व दोषी अधिकार्यांंवर कारवाईची मागणी केली. ही घटना लोकशाहीला काळीमा फासणारी असल्याचे सांगून कॉंग्रेस नेत्यांनी पोलिसांच्या दडपशाहीचा निषेध केला. काळ्या फिती लावून कॉंग्रेस शिष्टमंडळाने आपल्या तीव्र भावना याप्रसंगी व्यक्त केल्या.
पोलीस महासंचालकांनी या घटनेबद्दल खेद व्यक्त करून विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांना सदर प्रकाराची चौकशी करणायाचे आदेश दिल्याचे शिष्टमंडळाला सांगितले. तसेच चौकशीचा अहवाल येताक्षणी दोषी अधिकार्यांवर कारवाई केली जाईल असे आश्वासन कॉंग्रेस शिष्टमंडळाला दिले.
या शिष्टमंडळात कॉंग्रेसचे वरिष्ठ पदाधिकारी यथवंत हाप्पे, राजन भोसले, राजेश शर्मा, सोलापूर जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रकाश पाटील यांचा समावोश होता.