नवी मुंबई : दुष्काळग्रस्त शहापूर तालुक्यातील दुर्गम भागातील शे-पाचशे वस्तीच कोथळे गाव कात टाकतयं. आमदार संदीप नाईक यांनी आमदार आदर्श गाव दत्तक योजनेअंतर्गत हे गाव दत्तक घेतल्यानंतर या गावाचा विकास आराखडा तयार करून तो कृतीमध्ये उतरवत आहेत.
संपूर्ण मुंबईला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणारा धरणांचा तालुका म्हणून शहापूर तालुका ओळखला जातो. परंतु ’धरण उशाला आणि पाणी नाही प्यायला’, अशी येथील गावांची शोकांतिका आहे. पाणीटंचाई या तालुक्याच्या पाचवीला पुजलेली आहे. या तालुक्यातील कोथळे हे एक असेच गाव. पावसाच्या पाण्यावर भात, नाचणी आणि वरी अशी थोडीफार पिक घ्यायची आणि शेती नसेल तेव्हा जंगलातून रानमेवा गोळा करुन त्यावर उदरनिर्वाह करायचा,असा येथील ग्रामस्थांचा दिनक्रम. पाणीटंचाईमुळे अख्खं कुटुंबच पाणी मिळवण्याच्या कामाला जुंपलेले. शहरात जाऊन नोकरी-व्यवसाय करणार्यांची नावं शोधूनही सापडणार नाहीत. अशी या गावात प्रतिकूल परिस्थिती असताना आमदार संदीप नाईक यांनी एक आव्हान म्हणून हे गाव दत्तक घेतलं. या गावाच्या विकासाचं नियोजन केलं. परंतु शासनाच्या उदासीनतेमुळे विकासनिधी मिळाला नाही. आमदार नाईक यांनी चिकाटीने पाठपुरावा केला. या गावातील रस्त्यासाठी दहा लाख रुपये आणि गावातील कार्यालयासाठी वीस लाख रुपयांचा निधी शासनाकडून मंजूर करून घेतला आहे. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर हा निधी शासनाकडून या कामांसाठी वर्ग होणार आहे. कोथळे गावात विकासाची काम करण्यासाठी केवळ शासकीय मदतीवर अवलंबून न राहता आमदार संदीप नाईक यांनी औद्योगिक सामाजिक उत्तरदायित्व म्हणजेच सी.एस.आर. निधीतून सुविधांची कामे करण्याचे योजिले आहे. गावकर्यांचा जीवनस्तर उंचावण्यासाठी पिण्याचे पाणी, आरोग्य आणि शिक्षण या मूलभूत बाबींकडे आमदार नाईक यांनी लक्ष देऊन काम सुरू केले आहे. कोथळे गावात सध्या भीषण पाणीटंचाई आहे. ’मागेल त्याला टँकर’, असं शासनाचे धोरण असले तरी या गावात आठवड्यातून एकही पाण्याचा टँकर येत नाही. त्यामुळे सात ते आठ किलोमीटरवर जाऊन गावकर्यांना पिण्याचे पाणी आणावे लागते. गावकर्यांची पाण्यासाठी ही पायपीट पाहून दिवसातून दोन तरी पिण्याच्या पाण्याचे टँकर गावात येतील अशी तरतूद करण्यासाठी आमदार संदीप नाईक प्रयत्नशील आहेत. पावसाळा सुरू होईपर्यंत कोथळे वासियांना या पिण्याच्या पाण्याच्या टँकरमुळे दिलासा मिळणार आहे. कोथळे गाव भौगोलिक दृष्ट्या उंचीवर असल्याने याठिकाणी बोरवेल खोदण्यासाठी यंत्रणा येत नाही. बोरवेलच्या माध्यमातून कायमस्वरूपी पाण्याचा स्त्रोत निर्माण करण्याचा आमदार नाईक यांचा प्रयत्न आहे. त्यासाठी बोरवेल खोदणार्या लहान गाड्या याठिकाणी आणून बोरवेल खोदण्याचे नियोजन त्यांनी केले आहे. गावातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी आमदार नाईक सातत्याने प्रयत्नशील आहेत.
अतिशय दुर्गम भागात असलेल्या या कोथळे गावात पावसाळ्यामध्ये एखादी व्यक्ती आजारी पडली आणि तिला तातडीने वैद्यकीय उपचाराची आवश्यकता भासली तर गावातून जवळच्या शहरातील रुग्णालयात या व्यक्तीला हलविण्याची कोणतीही सोय नाही. अशा वेळेस या व्यक्तीचा जीव धोक्यात येतो. ही बाब लक्षात घेऊन आमदार नाईक त्यांनी स्वखर्चाने एक रुग्णवाहिका या गावासाठी देण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या जून महिन्यात ही रुग्णवाहिका कोथळे वासियांच्या सेवेत दाखल होऊन त्यांना वेळेवर वैद्यकीय उपचार कसे मिळतील याची काळजी ते घेणार आहे. आधुनिक शिक्षण हे प्रगतीच्या वाटा प्रशस्त करीत असते. ऐरोली विधानसभा या आपल्या मतदारसंघात आमदार संदीप नाईक यांनी अनेक शाळांमधून आमदार निधीच्या माध्यमातून डिजिटल क्लासरूम सुरू केलेले आहेत. कोथळे गावातील विद्यार्थ्यांना देखील शहरी भागातील विद्यार्थ्यांप्रमाणे आधुनिक शिक्षणाच्या पद्धती आत्मसात करता याव्यात यासाठी या गावातील शाळांमधून डिजिटल शिक्षणाची सोय ते उपलब्ध करून देणार आहेत. कोथळे गावातील तरुण आजही पारंपारिक शेतीवर आपला उदरनिर्वाह करतो आहे. या तरुणांना रोजगाराच्या नवीन संधींची माहिती व्हावी आणि जवळच्या औद्योगिक वसाहतीमधून त्यांना रोजगार मिळावा यासाठी आमदार संदीप नाईक प्रयत्नशील आहेत. यापूर्वी त्यांच्या माध्यमातून शहापूर तालुक्यासाठी भव्य असा रोजगार मेळावा भरविण्यात आला होता. अशाच प्रकारचा रोजगार मेळावा कोथळे वासियांसाठी भरविण्याचा त्यांचा मानस आहे. आमदार संदीप नाईक यांनी कोथळे गावाशी संपर्क कायम ठेवला असून या गावाच्या विकासाची कृतिशील काळजी घेतलेली आहे.