नेलकारंजी (सांगली): अरब व्यापाऱ्यांच्याही आधी बौद्ध समाजातील शेकडो व्यापारी व्यवसायानिमित्त देश-परदेशात समुद्रमार्गे सातत्याने प्रवास करीत असत. त्यांच्या व्यवसायाचा दराराही परदेशात होता. दळणवळणासाठी जहाजांतून समुद्रमार्गे प्रवास होत होता. त्यामुळे अरबी समुद्रावर बौद्ध समाजाचे साम्राज्य होते, याची जाणीव ठेवून केंद्र सरकारने अरबी समुद्राचे तथागत समुद्र असे नामकरण करावे, असे परखड मत सामाजिक तथा वैचारिक चळवळीचे कार्यकर्ते कांतीलाल कडू यांनी मांडले.
विकास सामाजिक प्रतिष्ठानने तथागत गौतमबुद्ध आणि घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्तिक जयंतीचा कार्यक्रम सांगली जिल्ह्यातील, आटपाडी तालुक्यातील नेलकारंजी येथे आयोजित केला होता, त्याप्रसंगी कडू यांचे व्याख्यान आयोजित केले होते. तेव्हा त्यांनी ही महत्वपूर्ण माहिती दिली.
तथागत आणि बाबासाहेब यांची विचारसरणीच देशाला महासत्ता बनवू शकते, असा दावा करून कडू म्हणाले की, काही शक्ती राजकीय सत्तेच्या माध्यमातून संविधानाला छेडछेड करण्याचा प्रयत्न करीत आहेत, तो धोका वेळीच ओळखून बाबासाहेबांच्या अनुयायांनी संघटितपणे घटनेवर होणारे छुपे हल्लेही रोखले पाहिजेत.
अडीच हजार वर्षापूर्वी तथागतांनी एका राजाला दुखीकष्ठी पाहिले आणि मुलगी झाली म्हणून दुखी होण्याच्या विकल्पापासून त्याला दूर राहण्याचा सल्ला दिला, असे स्पष्ट करत कडू म्हणाले की, आम्ही अलीकडे स्त्री भ्रूणहत्येला विरोध करायला लागलो आहोत या सकारात्मक आणि देशविधायक चळवळीचा पाया तथागतांनी रचला असल्याचे उदाहरणासह स्पष्ट केले.
डॉ. बाबासाहेबांनी प्रतिकूल परिस्थिती स्वतःला घडवले आणि समाजाला बंधुत्व, समता, एकतेची दिक्षा दिली. आज आंबेडकरी चळवळीची अनेक शकले पडल्याने आपण सारे थोडे मागे पडल्यासारखे वाटत असेल पण खचून जाण्याचे कारण नाही. आपल्याकडे आर्थिक मागासलेपणा एक वेळ असू शकेल, पण वैचारिकतेचे दारिद्य्र कधीच असू शकत नाही. बाबासाहेब आणि तथागतांनी प्रचंड विदवत्ता आपल्याला दिली आहे. त्या बळावर आतापर्यंत बौद्ध आणि एकूणच बहुजन समाजाने अनेक वादळे परतवून लावली आहेत. आभाळ, जमीन आणि समुद्रावरही आपली मालकी हक्क असताना आणि त्यातही विचारांचे आभाळ आपल्याकडे असताना अन्यायाला पायदळी तुडवले पाहिजे. जिथे अन्याय होत असेल तिथे पाय रोवून उभे राहता आले तर आपण बाबासाहेबांचे विचार अंमलात आणल्यासारखे होईल, असा दावा कडू यांनी केला.
कडू यांनी यावेळी काही धार्मिक दाखले दिले. मानवता आणि प्रेम हे मानवी जीवनाचे अधिष्ठान आहे. ते जपता येणे खुप गरजेचे असून संस्थेचे अध्यक्ष आणि नाबार्डचे निवृत्त मुख्य कार्यकारी अधिकारी बी. बी. घाडगे यांच्या उपक्रमाबद्दल तोंड भरून कौतुक केले.
ज्येष्ठ संपादक आणि विचारवंत विजयकुमार मोरे आणि बी. बी. घाडगे यांनी मौलिक विचार मांडले. कार्यक्रमाला एक हजाराहून अधिक श्रोत्यांची उपस्थिती होती. जयंतीनिमित्ताने दिवसभर विविध कार्यक्रमांची रेलचेल होती.