मुख्यमंत्री काँग्रेस पक्ष फोडण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप
स्वयंम न्युज ब्युरो
मुंबई : लोकसभा निवडणुकीत चांगले यश मिळाले म्हणून भारतीय जनता पक्षाने हुरळून जाण्याची गरज नाही. या सरकारवर लोक नाराज आहेत, ही वस्तुस्थिती आहे. लोकसभा व विधानसभा निवडणुकीचे निकाल वेगवेगळे असू शकतात, हे यापूर्वी अनेकदा सिद्ध झाले आहे आणि महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीतही तेच दिसून येईल, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.
शुक्रवारी दुपारी टिळक भवन येथे आयोजित बैठकीनंतर पत्रकारांना प्रतिक्रिया देताना त्यांनी हा विश्वास व्यक्त केला. अहमदनगर जिल्ह्यात काँग्रेस आघाडी शिल्लक ठेवणार नाही, या राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विधानाचाही त्यांनी यावेळी चांगलाच समाचार घेतला. लोकसभेचा एक विजय मिळाला म्हणून विखे पाटील यांनी फाजील आत्मविश्वास बाळगणे योग्य नसल्याचा टोला काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी लगावला. काँग्रेस पक्षाचे आमदार फोडण्यासाठी मुख्यमंत्री प्रचंड खटाटोप करीत आहेत. अनेक आमदारांना ते फोन करीत आहेत. मात्र आता कोणीही पक्ष सोडेल, असे वाटत नसल्याचे अशोक चव्हाण यांनी यावेळी सांगितले.
निवडणूक आली की शिवसेनेला राम मंदिराची आठवण होते. आता विधानसभेची निवडणूक जवळ येत असल्याने उद्धव ठाकरे अयोध्या दौऱ्यावर निघाल्याचेही त्यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबाबत केलेल्या विधानावर प्रतिक्रिया व्यक्त करण्यास त्यांनी नकार दिला. संघाकडून घेण्यासारखे काहीही नाही. काँग्रेस पक्ष नेहमी संघाशी संघर्ष करीत आला आहे. आम्ही कधीही संघाचे अनुकरण करणार नाही, असे अशोक चव्हाण पुढे म्हणाले.