मनसे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविणार १० हजार पोस्ट कार्ड…!!
स्वयंम न्युज ब्युरो
नवी मुंबई : तमिळसह संस्कृत, तेलगु, कन्नड, मल्याळम, ओडीआ या सहा भाषांना अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे. त्याचप्रमाणे मराठीने अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्यासंदर्भातील सर्व निकष पूर्ण करून आता साडेचार वर्ष उलटली आहेत. केंद्र सरकारने नियुक्त केलेल्या भाषा तज्ञांनी एकमताने मराठीच्या बाजूने शिफारस केलेली असतानाही केंद्र सरकार ही घोषणा करायला टाळाटाळ करीत आहे. त्यामुळेच मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा या मागणीबाबत दबाव वाढविण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना, नवी मुंबई शहराच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना १० हजार पोस्टकार्ड पाठविणार अशी घोषणा नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी केली आहे.
पठारे समितीने आपल्या अहवालात मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा या संदर्भातील सर्व कागदपत्रे, पुरावे, सादर केली आहेत, मात्र तरीही राज्य सरकार केंद्रावर दबाव आणत नाही आहे. त्यामुळेच मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा प्रस्ताव अजून केंद्र सरकारकडे प्रलंबित आहे. त्यामुळेच मनसे पोस्टकार्डच्या माध्यमातून महाराष्ट्रातील मराठी जनतेच्या वतीने त्यांच्या भावना केंद्र सरकार कडे पोहचविणार असल्याची माहिती गजानन काळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
तमिळ व इतर दक्षिणी भाषाकडून आपण भाषाप्रेम शिकायला हवे असे मत काल परवाच पठारे समितीचे समन्वयक हरी नरके यांनी व्यक्त केले होते व यापुढे राजकीय दबाव निर्माण करण्याचे काम, नागरिकांचे आहे असेही ते पुढे म्हणाले होते तोच आशय घेत केंद्र सरकार वर दबाव निर्माण करण्यासाठी व मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी मनसेने ही पोस्टकार्ड मोहीम सुरु केली असल्याचे मत मनसेचे गजानन काळे यांनी दिले आहे.
नवी मुंबईतीलच नव्हे तर महाराष्ट्रातील जनतेनेही याला प्रतिसाद द्यावा व मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी आपले मत पोस्ट कार्ड वर लिहून मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवावे असे गजानन काळे यांनी मांडले आहे.