मुंबई : सत्तेसाठी काहीही करणाऱ्या सेना-भाजपत सध्या छोटा-भाऊ आणि मोठा भाऊ कोण? यावरून वाद सुरु आहेत. मात्र, त्यामुळे राज्यातील जनतेचे हाल होत असल्याची टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी मुंबईत केली. भाजप-सेनेला लोकसभा निवडणूक जिंकायची होती म्हणून त्यांना त्यावेळी शेतकरी आणि राज्यातील इतर प्रश्न दिसत होते. आता त्यांना कोणाशी देणेघेणे उरले नसल्याचे शेतकऱ्यांच्या कर्जमाफी विषयावरून दिसत असल्याचे चव्हाण म्हणाले.
औरंगाबाद येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याच्या विषयावर ‘कर्जमाफी बरोबर सरकारी तिजोरीचाही विचार केला पाहिजे’ असे विधान केल्याने त्यावर चव्हाण यांनी जोरदार टीका केली. निवडणूक झाली, सरकार आले म्हणून शिवसेनेला शेतकऱ्यांची गरज राहिली नाही. सध्या वातावरण आपले आहे, असा सेनेचा समज आहे. त्यामुळेच त्यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीला बगल देत सरकारच्या तिजोरीची चिंता केली. यामुळेच विधानसभेला शेतकऱ्यांची गरज नाही, असे भाजप सेनेला वाटते. मात्र, त्यांचा सर्व भ्रम राज्यातील जनता उतरून टाकेल, असेही चव्हाण यांनी सांगितले.
आगामी विधानसभा निवडणुकीत अधिकाधिक नवीन चेहऱ्यांना संधी मिळावी म्हणूनच काँग्रसने विधानसभेसाठी अर्ज करण्यासाठी ६ जुलैपर्यंत मुदत वाढवली आहे. यात अनेक तरुण उमदेवार समोर येतील अशी अपेक्षा आहे. विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने नियोजनाला सुरूवात केली असून, विविध पातळ्यांवर तयारी सुरू झाली आहे.
नियमितपणे विविध पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन नियोजनाचा आणि पूर्वतयारीचा आढावा घेत आहोत. याचाच एक भाग म्हणून प्रदेश काँग्रेसने विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांचे लेखी अर्ज मागवले आहेत. यामध्ये नवीन चेहऱ्यांना संधी देण्याची तयारी सुरू असल्याचे चव्हाण यांनी स्पष्ट केले.