मुंबई : राज्यात मुंबईतील टाटा कॅन्सर रिसर्च सेंटर बरोबरच औरंगाबाद, नागपूर आणि चंद्रपूर येथे कर्करोग रुग्णांना आता चार ठिकाणी उपचार घेता येतील त्यासाठी अद्ययावत सुविधा उभारण्यात येत आहेत, अशी माहिती वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीष महाजन यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासाला दिली.
नागपूर येथील कर्करोग रुग्णालयाचे बांधकाम सुरु करण्यासंबंधी सदस्य गिरिशचंद्र व्यास यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना महाजन बोलत होते.
महाजन म्हणाले, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय नागपूर येथे कर्करोग उपचार सोयी सुविधांसाठी 76.1058 कोटी रुपये रकमेच्या अंदाजपत्रकास मान्यता देण्यात आली आहे. नागपूर सुधार प्रन्यास प्राधिकरणामार्फत बांधकामाची प्रक्रिया करण्यात येणार आहे. नागपूर येथे 150 खाटा, तर चंद्रपूर आणि औरंगाबाद येथे प्रत्येकी 100 खाटा असलेले कर्करोग उपचार केंद्र असणार आहे. जळगाव येथेही याच धर्तीवर कर्करोग उपचार केंद्र सुरु व्हावे, अशी मागणी केंद्र शासनाकडे केली असल्याचेही त्यांनी सांगितले.