श्रीकांत पिंगळे
नवी मुंबई : शुक्रवार सकाळपासून सुरू असलेल्या पावसाने शनिवारीही विश्रांती घेण्याचे टाळले. सकाळापासून सुरू असलेला पाऊस उघडण्याची कोणतीही चिन्हे नसल्याने नवी मुंबईकरांची त्रेधातिरपिट उडाली आहे.
पहिल्याच पावसात नेरूळमधील शिवसेना नगरसेवक काशिनाथ पवार यांच्या प्रभागातील गजोबाला गळती लागल्याने नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे. नेरूळ, सानपाडा, जुईनगर भागात ठिकठिकाणी झाडाच्या फांद्या पडल्या आहेत. पावसाने सातत्य राखत उघडीप न घेतल्याने फेरीवाल्यांच्या धंद्यावर परिणाम झाला असून पावसामुळे ग्राहक फिरकलाही नाही. चहाच्या टपऱ्यांवर मात्र गर्दी वाढली असून घरातून बाहेर पडत युवा वर्ग चहाच्या टपऱ्यांवर टाईमपास करताना पहावयास मिळाला आहे. दुचाकीवाल्यांचे मात्र हाल झाले असून त्यांना पुलाखाली आश्रय घेण्याची वेळ आली आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील फळ, कांदा बटाटा, भाजी व किराणा दुकान मार्केटच्याही उलाढालीवर शुक्रवार व शनिवारी परिणाम झाला असून ग्राहकांनी पाठ फिरविल्याचे दिसून आले. शनिवारी इंग्रजी माध्यमाच्या तसेच कॉन्व्हेंटच्या शाळा बंद असल्याने शालेय मुलांची मात्र या त्रासापासून सुटका झाली. अनेक ठिकाणी गटारे तुंबल्याने तसेच काही ठिकाणी गटारांमध्ये जाण्यासाठी ठेकेदारांनी रस्त्याच्या कोपऱ्यात जागा न ठेवल्याने रस्त्यावरून पाणी वाहताना पहावयास मिळाले.
ज्वेल ऑफ नवी मुंबईला तलावाजवळ मुसळधार पाऊसातही प्रेमी युगुलांनी गर्दी केल्याचे दिसून आले. रस्त्यावर सर्वत्र वर्दळ तुरळक प्रमाणात होती. रेल्वे सेवेवर या पाऊसाचा विशेष परिणाम झाला नसला तरी रेल्वे १५ ते २० मिनिटे उशिराने धावत होती.