अक्षय काळे
मुंबई : वडाळा ते जेकब सर्कल मोनोरेल मार्गावरील दादर पूर्व स्टेशनला विठ्ठल मंदिर वडाळा असे नाव द्यावे, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते डॉ. राजू वाघमारे यांनी केली आहे.
डॉ. राजू वाघमारे यांनी शिष्टमंडळासह एमएमआरडीएचे सह आयुक्त संजय खंडारे यांची भेट घेऊन मागणीचे निवदेन सादर केले. या भागातले विठ्ठल मंदिर हे ४०० वर्षापूर्वीचे असून त्याला प्रति पंढरपूर असेही म्हटले जाते. स्वतः संत तुकाराम महाराज यांनी या विठ्ठल मंदिराची प्राण प्रतिष्ठा केलेली आहे. वडाळा व नायगाव या भागातील स्थानिक लोकांच्या भावना लक्षात घेऊन दादर पूर्व हे नाव बदलून विठ्ठल मंदिर, वडाळा असे देण्यात यावे अशी मागणी डॉ. वाघमारे यांनी यावेळी केली.
स्टेशनचे नाव बदलावे यासाठी एमएमआरडीएकडे याआधीही पाठपुरावा करण्यात आला होता, पण त्यावर कार्यवाही झालेली नाही. आतातरी लोकांच्या या मागणीचा विचार करून स्टेशनचे नाव बदलावे अन्यथा तीव्र आंदोलन करू, असा इशारा डॉ. वाघमारे यांनी दिला आहे.