मुंबई – विविध मागण्यांसाठी रिक्षा चालक संघटनांनी सोमवारी मध्यरात्रीपासून पुकारलेला बेमुदत संप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आश्वासनानंतर मागे घेण्यात आला आहे. सोमवारी मंत्रालयात परिवहन सचिव यांच्यासोबत रिक्षा चालक संघटनेची पार पडलेली बैठक निष्फल ठरली. त्यानंतर रिक्षा चालक संघटना संपावर ठाम होत्या. मात्र, ऐन पावसात प्रवाशांना वेठीस धरू नये यासाठी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना यात हस्तक्षेप करावा लागला आहे. रिक्षा चालकांच्या मागण्या ऐकून घेण्यासाठी उद्या (मंगळवारी) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या दालनात परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्यासह ऑटो रिक्षा चालक मालक संघटना संयुक्त कृति समिती, महाराष्ट्रच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे.
मुख्यमंत्री उद्या (मंगळवारी) या बैठकीत तोडगा काढतील अशी आशा कृती समितीला आहे. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी संप मागे घेत असल्याची घोषणा ऑटो रिक्षा चालक मालक संघटना संयुक्त कृति समिती महाराष्ट्रचे अध्यक्ष शशांक राव यांनी केली आहे.