नव मुंबई : ८ जुलै रोजी सकाळी ८ वाजल्यापासून कमी कालावधीत मोठ्या प्रमाणावर पर्जन्यवृष्टी झाल्याने शहरातील काही सखल भागात पाणी साचल्याच्या तसेच बोनसरी आणि महावीर कॉरी येथील घटनांच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी संबंधित अधिका-यांसमवेत शहरात विविध ठिकाणांची पाहणी केली व यापुढील काळात अडचणी उद्भवू नयेत यादृष्टीने निर्देश दिले. याप्रसंगी त्यांच्या समवेत शहर अभियंता श्री. सुरेंद्र पाटील, परिमंडळ 1 चे उप आयुक्त श्री. दादासाहेब चाबुकस्वार, कार्यकारी अभियंता श्री. सुभाष सोनावणे व श्री. मनोज पाटील, सहा. आयुक्त श्रीम. संध्या अंबादे व श्री. संजय तायडे, मुख्य स्वच्छता अधिकारी श्री. राजेंद्र सोनावणे उपस्थित होते.
तुर्भे एम.आय.डी.सी.तील बोनसरी भागातील नैसर्गिक नाल्यालगतच्या वसाहतीत काल पावसाचे पाणी शिरल्याच्या अनुषंगाने आयुक्तांनी त्याठिकाणी भेट दिली व नैसर्गिक नाल्यात मोठ्या पावसामुळे वाहून आलेले जवळच्या दगड खाणीतील मोठे दगड जेसीबी व पोकलनव्दारे काढून टाकण्याच्या कामाची पाहणी केली. त्याठिकाणी नाल्याला संरंक्षक भिंत बांधण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्याचे निर्देश त्यांनी अभियांत्रिकी विभागाला दिले.
तुर्भे गणपतीपाडा येथील महावीर कॉरी ठिकाणच्या नैसर्गिक नाल्याशेजारील वस्तीमधील चार झोपड्या पावसाळी पाण्यात वाहून गेल्या व चौदा, पंधरा घरांमध्ये पाणी शिरून नुकसान झालेल्या ठिकाणाची आयुक्तांनी पाहणी केली. या झोपडी धारकांची तुर्भे विभाग कार्यालयामार्फत लगेचच नजिकच्या इंदिरानगर समाज मंदिरात व्यवस्था करण्यात येऊन त्यांच्या अल्पोपहार व जेवणाचीही व्यवस्था केलेली होती. त्यांना आवश्यक धान्य पुरवठाही करण्यात आलेला आहे. याठिकाणी दगडखाण मालक पीर मोहम्मद शेख यांनी आपल्या दगडखाणीकडे जाण्यासाठी रस्ता बनविल्याने नाल्याचा नैसर्गिक प्रवाह बंद झाला. हे लक्षात घेऊन संबंधित दगडखाणी मालकांना आपत्कालीन व्यवस्थापन कायद्यानुसार नोटीस बजाविण्यात येत आहे. सदर जबाबदारी पेंटर क्वॉरी व ओंकार क्वॉरी मालकांची असल्याने त्यांचेमार्फत नाल्यातील अडथळे दूर करण्याचे काम करून घेतले जात आहे.
कालच्या कमी वेळेत झालेल्या मोठ्या प्रमाणावरील पावसामुळे डोंगरातून वाहत येणारे पाणी नैसर्गिक नाल्याच्या अरूंदपणामुळे तसेच मोठ्या पावसात झाडे व झाडांच्या फांद्याही नाल्यात वाहत आल्याने सायन पनवेल महामार्गावर आय.टी.पार्क. समोर शरयू मोटार्स नजिक साचून राहिले आणि वाहतुकीला अडथळा होऊन नागरिकांना मोठ्या प्रमाणावर त्रास झाला. या जागेची पाहणी करून आयुक्तांनी त्या नैसर्गिक नाल्याची खोली वाढविण्याचे सूचित करून दोन्ही बाजुने संरंक्षक भिंत बांधण्याचे निर्देश दिले, जेणेकरून पाण्याचा निचरा व्यवस्थित होईल.
त्याचप्रमाणे डॉ. डी.वाय. पाटील रुग्णालयाच्या मागील बाजूस आर्मी कॉलनी जवळील रस्त्यावर पाणी साचण्याच्या जागेचीही पाहणी करून डी.वाय.पाटील स्टेडियम जवळील मैदानातून मोठ्या प्रमाणावर पाणी येते हे लक्षात घेता त्याठिकाणी त्यांच्या पावसाळी पाण्याच्या गटाराची व्यवस्था करण्याची नोटीस डी.वाय.पाटील मैदान व्यवस्थापनाला देण्याचे आयुक्तांनी निर्देशित केले.
तुर्भे से. 21 व से. 20 येथील सखल भागात पाणी साचण्याच्या ठिकाणांची आयुक्तांनी पाहणी केली. याठिकाणी पावसाचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन महानगरपालिकेने कालच्या पावसात त्वरीत पाणी उपसा पंपांमध्ये वाढ केली होती. आजच्या पाहणीमध्ये अंजुमन इस्लाम उर्दु शाळेलगत पावसाळी पाणी वाहून नेण्याकरीता असलेले गटार शाळेने बंद केल्याने त्या भागात पाणी साठल्याचे निदर्शनास आल्याने आयुक्तांनी सदर शाळेस नोटीस बजावण्याचे निर्देश दिले.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने आपत्ती व्यवस्थापनाबाबत योग्य ती खबरदारी घेण्यात आली असून नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्र हे समुद्र सपाटीपासून खालच्या पातळीवर वसलेले असल्याने मोठ्या प्रमाणावरील पाऊस आणि भरतीची वेळ एकत्र आल्यास काही ठिकाणी पाणी साचल्याचे निदर्शनास येते. अशाठिकाणी पाणी उपसा पंप व अनुषांगिक व्यवस्था महानगरपालिकेच्या वतीने पुरविण्यात आली असून आपत्ती व्यवस्थापन यंत्रणाही सतर्क राहून कार्यरत असते. कालच्याही दिवसभरात पडलेल्या सरासरी 128.25 मी.मी. व त्यातही सकाळी 8.30 पासून 12.30 पर्यंत चार तासात पडलेल्या 81.10 मी.मी. इतक्या मोठ्या पावसात महानगरपालिकेची आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा पोलीस विभागासमवेत बचावात्मक कार्य करण्यासाठी सक्रीय होती. या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी आज सकाळीच विविध ठिकाणांना भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली व मार्गदर्शक सूचना केल्या. नागरिकांनी आपत्कालीन प्रसंगी नजिकच्या विभाग कार्यालयात अथवा टोल फ्री क्रमांक 1800222309 / 1800222310 या क्रमांकावर संपर्क साधावा आणि अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन करण्यात येत आहे.