सुवर्णा खांडगेपाटील
नवी मुंबई : केंद्र व राज्य सरकारचे सातत्याने पुरस्कार घेणाऱ्या नवी मुंबई महानगरपालिका प्रशासनाचा कारभार गलथान झाला असल्याची नेहमीच प्रचिती येते. नवी मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या परिवहन उपक्रमाच्या कारभाराचे तीन तेरा वाजले असून प्रवाशांचा यातून प्रवास म्हणजे जिवितावर मृत्यूची टांगती तलवार असल्याचे नेहमीच दिसून येते. गुरूवारी सकाळी पावणे अकरा वाजण्याच्या सुमारास जुईनगर रेल्वे स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या सानपाडा स्टेशन परिसरात पालिका उद्यानासमोर महापालिका परिवहन उपक्रमाच्या धावत्या बसचे चाक निखळून पडल्याची घटना घडली. दुर्दैवाने बस चौकात वळसा मारत असताना वेग कमी असल्यामुळे कोणी प्रवाशी जखमी झाला नाही. काही प्रवाशांना मात्र मुका मार बसला आहे.
महापालिका परिवहन उपक्रमाची (एनएमएमटी) बस क्रं १८ ही उलव्याहून वाशीकडे चालली होती. मिलेनिअम पार्क येथील इमारतीच्या कोपऱ्यावर पालिका उद्यानाच्या समोर धर्माधिकारी चौकात ही चालत्या बसचे चाक निखळण्याची घटना घडली. पावणे अकरा वाजण्याच्या सुमारास परिवहन उपक्रमाची बस (क्रं. एमएच ४३ एच५२७३) ही या चौकात आली असता चालकाच्या खालील बाजूस असणारे चाक अचानक निखळून बाहेर पडले. सु्र्दैवाने बस चौकात वळसा मारणार असल्याने वेग कमी होता व त्यावेळी रस्त्यावर अन्य वाहनांची वर्दळही नसल्याने कोणतीही हानी झाली नाही. मात्र या घटनेमुळे पालिका परिवहन उपक्रम बसेसची घेत असलेल्या काळजीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून या घटनेने परिवहन उपक्रमाची नाचक्की झाली आहे. बस डेपोतून बाहेर काढताना चाचपणी केली असती तर चालत्या बसचे चाक निखळण्याची घटना घडली नसती असे सांगण्यात येत आहे. याप्रकरणी आमदार संदीप नाईक यांनी तात्काळ पालिका प्रशासनाशी संपर्क करून संबंधित घटनेची चौकशी करण्याची व संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली.