पनवेल : वाढदिवस म्हटलं की आनंदाचा दिवस पण तो आनंद आपण दुसर्याच्या चेहर्यावर परावर्तीत करु शकलो तर व्दिगुणित होतो. आणि म्हणूनच वाढदिवशी सामाजिक उपक्रम राबवून आपल्या आनंदात सर्वांना सहभागी करुन घेण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे. अर्थातच यात केवळ माझेच श्रेय नाही तर माझे पती जगदिश घरत व अस्मिता कला क्रिडा सांस्कृतिक मंडळ व प्रियदर्शनी महिला मंडळाच्या पदाधिकारी व सदस्यांचा मोलाचा वाटा आहे. त्यांच्या अथक परिश्रमाशिवाय हा कार्यक्रम होणे केवळ अशक्य असल्याचे प्रतिपादन नगरसेविका सुशिला घरत यांनी केले. त्यांच्या वाढदिवसा निमित्त गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव व ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार कार्यक्रमाचे आयोजन नवीन पनवेल येथील सिकेटी हायस्कुलमध्येे करण्यात आले होते, त्यावेळी त्या बोलत होत्या.
त्या पुढे म्हणाल्या की, भारत हा तरुणांचा देश म्हणून ओळखला जातो आणि म्हणूनच त्यांना प्रोत्साहन देण्याचे काम आपण केले पाहिजे आणि म्हणूनच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करुन त्यांच्या पुढील वाटचालीसाठी प्रोत्साहित करण्याचे काम या ठिकाणी केले जात आहे. तरुणांचा देशाच्या जडणघडणीत महत्चाचे स्थान आहे. त्याचप्रमाणे ज्येष्ठांनी देशाला दिलेले योगदानही विसरता कामा नये. ज्येष्ठांचा आदर राखण्याची आपली परंपरा आहे. त्यामुळेच त्यांच्या अनुभवाला सलाम करण्यासाठीच त्यांचा सत्कारा या ठिकाणी करण्यात येत आहे. तरुणांचा जोश आणि ज्येष्ठांचे अनुभव यांचा संयम झाल्यास देशाची प्रगती आणखी वेगाने होईल आणि म्हणूनच या ठिकाणी जमलेल्या विद्यार्थ्यांना हेच सांगणे आहे की व्हॉटस अॅप आणि फेसबुकवर मिळणार्या ज्ञानापेक्षा आपल्या घरी असलेल्या ज्येष्ठांकडून ज्ञान घ्या. त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. तरुण आणि ज्येष्ठ यामधला दुवा होण्याचा प्रयत्न पालकांनी करावयास हवा. आजचा तरुण भरकटत चालला आहे असे म्हटले जाते. परंतु तो एकटाच त्याला कारणीभूत आहे का? याचा विचारही होणे गरजेचे आहे. आजची पिढीही प्रचंड हुशार आहे. परंतु त्यांच्या हुशारीला योग्य वळणावर आणणे हे पालकांचे कर्तव्य आहे. आज येथे जमलेल्या विद्यार्थ्यांना माझे हेच सांगणे आहे की ज्येष्ठांचा आदर राखा त्यांच्या अनुभवाचा फायदा घ्या. मी येथे आवर्जून सांगू इच्छिते की, आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन लाभते ते आदरणीय लोकनेते आमचे प्रेरणास्थान रामशेठ ठाकूर यांच्या कडून. तसेच आमदार प्रशांत ठाकूर यांचेही प्रत्येक कार्यक्रमासाठी मोलाचे सहकार्य मिळते आणि ते नेहमीच समाजकार्यासाठी आम्हाला प्रेरणा देत असतात.
तरुण आणि ज्येष्ठ एकाच कार्यक्रमाला हजर राहण्याचा हा दुर्मिळ योग माइया वाढदिवसानिमित्त जुळून आल्याचा मला अभिमान वाटतो आणि त्यांच्यासमोर मला दोन शब्द बोलण्याची संधीही मिळाली हे मी माझे भाग्य समजते असे सांगत वाढदिवसानिमित्त मला शुभेच्छा देण्यासाठी एवढया मोठया संख्येने उपस्थित राहिल्याबद्दल त्यांनी सर्वांचे आभार मानले. त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, वाय. टी. देशमुख, माजी नगराध्यक्ष चारुशीला घरत, पं. स. सदस्या रत्नप्रभा घरत, नगरसेविका वृषाली वाघमारे, दर्शना भोईर व सामाजिक कार्यकर्ते जगदीश घरत तसेच अन्य मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.