नवी मुंबई : प्रधानमंत्री जन आरोग्य योजने अंतर्गत नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील पात्र 40,363 कुटूंबातील लाभार्थींना प्रतिकुटूंब वार्षिक 5 लाख रुपयांपर्यंतचे आरोग्य विमा संरक्षण – वैद्यकीय उपचार उपलब्ध होणार असून नवी मुंबई महापालिका आयुक्त श्री. अण्णासाहेब मिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात येत आहे.
प्रधानमंत्री जन आरोग्य योजना ही महाराष्ट्र राज्यामध्ये दि. 23 सप्टेंबर 2018 पासून राबविण्यात येत असून या योजने अंतर्गत सामाजिक, आर्थिक व जातीय जनगणनेमधील कचरावेचक, घरकाम करणारे, फेरीवाले, बांधकाम मजूर, कारागीर अशा 11 वर्गातील एकूण 83.72 लक्ष कुटूंबाचा समावेश आहे. यामध्ये नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील 40,364 कुटूंबाचा समावेश असून 1,72,393 इतके लाभार्थी या योजनेकरिता पात्र आहेत. लाभार्थी कुटूंबाना प्रतिवर्ष रु. 5 लाखपर्यंत विमा संरक्षण राज्य आरोग्य हमी सोसायटीमार्फत हमी तत्वावर उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. यामध्ये सर्जिकल व मेडिकल उपचार मान्यताप्राप्त खाजगी व शासकीय रूग्णालयामार्फत उपलब्ध होणार आहेत.
या योजनेमध्ये लाभार्थ्यांचा पाठपुरावा करुन ई-कार्ड देण्याकरिता महानगरपालिकेमार्फत नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांचे वैद्यकीय अधिकारी व आपले सरकार धारक यांची समन्वय सभा महापालिका मुख्यालयात उपआयुक्त श्री. अमोल यादव यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पाडली. या सभेमध्ये वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. बाळासाहेब सोनावणे, सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. दयानंद कटके, अपघात वैद्यकीय अधिकारी डॉ. रत्नप्रभा चव्हाण, समन्वय राज्य हमी सोसायटी श्री. प्रविण मोटे, जिल्हा व्यवस्थापक ठाणे श्री. अमोल निमसे आदी अधिकारी उपस्थित होते. या मोहिमेमध्ये नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी व सिटीजन सर्व्हिस सेंटर यांनी एकत्रितपणे जबाबदारी स्विकारुन लाभार्थ्यांना ई-कार्ड मिळेपर्यंत पाठपुरावा करावा व ही मोहिम 100% यशस्वीपणे राबविण्याचे निर्देश उपआयुक्त श्री. अमोल यादव यांनी दिले.
या योजनेत पात्र लाभार्थ्यांनी गोल्डन ई-कार्ड मिळण्याकरीता शिधापत्रिका, आधारकार्ड व मा.प्रधानमंत्री यांचे स्वाक्षरीचे वितरीत केलेले पत्र असल्यास अशी कागदपत्रे आपल्या नजिकच्या सिटीजन सर्व्हिस सेंटर मध्ये जाऊन सादर करावयाची आहेत. याविषयीच्या अधिक माहितीकरीता पात्र लाभार्थ्यांनी त्यांच्या नजिकच्या नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात येत आहे.