स्वयंम न्यूज ब्युरो : navimumbailive.com@gmail.com
काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी केला पूरग्रस्त भागाचा दौरा!
मुंबई : सांगली, सातारा, कोल्हापूर भागात पूराची स्थिती अत्यंत गंभीर झाली आहे. लाखो लोक रस्त्यावर आले आहे पण सरकार पूरग्रस्तांना मदत करण्याबाबात गंभीर नाही. त्यामुळे काँग्रेस पक्षाचे आमदार, खासदार एक महिन्याचे वेतन पूरग्रस्तांना मदत म्हणून देणार आहेत. सरकारनेही शासन निर्णयात बदल करून उद्धवस्त झालेल्या नागरिकांना, सर्व पूरग्रस्तांना सरसकट मदत करावी अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आ. बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आ. बाळासाहेब थोरात व विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सांगली, सातारा व कोल्हापूर जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागाचा दौरा केला यावेळी आ. डॉ. विश्वजीत कदम, आ. आनंदराव पाटील त्यांच्यासोबत होते. आ. थोरात यांनी पूरग्रस्त नागरिकांच्या भेटी घेऊन त्यांची विचारपूस केली. यावेळी बोलताना ते म्हणाले की, संकटाच्या काळात नागरिकांना मदत करणे हे सरकारचे कर्तव्य आहे पण सरकार या भागातील नागरिकांना मदत करण्याबाबत गंभीर नाही. अद्याप हजारो लोक पुरामध्ये अडकून पडले आहेत. त्यांना सुरक्षित स्थळी हलवण्याऐवजी सरकारचे मंत्री बोटींमधून पर्यटन करत आहेत. हे अत्यंत संतापजनक आहे. लोक उघड्यावर आले असताना सरकारचा मदतीचा शासन निर्णय हा लोकांची क्रूर थट्टा आहे. सरकारने हा शासन निर्णय तात्काळ रद्द करून सर्व पूरग्रस्तांना सरसकट मदत द्यावी असे आ. थोरात म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, जनतेला कितीही त्रास झाला तरी ते आपल्यालाच मतदान करतात या मानसिकतेतून बाहेर येऊन सरकारने या संकटाकडे गंभीरपणे पहावे. काँग्रेस आमदार डॉ. विश्वजीत कदम, आ. सतेज उर्फ बंटी पाटील यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते गेल्या चार दिवसांपासून पाण्यात उतरून लोकांची मदत करत आहेत. पण भाजपचे मंत्री, आमदार, खासदार मात्र मदतकार्यात दिसत नाहीत. पश्चिम महाराष्ट्रावर आलेल्या संकटात काँग्रेस पक्ष पूर्णपणे लोकांच्या पाठीशी असून काँग्रेस कार्यकर्त्यांनी शक्य असेल ती मदत करावे असे आवाहन त्यांनी केले. युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आज स्थापना दिवसाचे कार्यक्रम रद्द करून पूरग्रस्तांच्या मदतीसाठी राज्यभरात मदत फे-या काढल्या आहेत. या माध्यमातून जमलेली मदत पूरग्रस्तांना देण्यात येईल. सरकारनेही कागदी घोडे नाचवण्यापेक्षा मानवतेच्या दृष्टीकोनातून या संकटकाळी तात्काळ मदत उपलब्ध करून द्यावी. या कठीण काळात केंद्र सरकारने राज्याला मदत करण्याची आवश्यकता आहे पण केंद्राने अद्याप मदत जाहीर केली नाही. राज्य सरकारने केंद्राकडे पाठपुरावा करून निधी मिळवावा व पूरग्रस्तांना मदत करावी असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.