नवी मुंबई : कार्ला येथील एकवीरा देवीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या पायऱ्यांची तात्काळ डागडूजी करण्याची मागणी नवी मुंबईतील सारसोळे गावातील कोलवाणी माता मित्र मंडळाचे अध्यक्ष मनोज यशवंत मेहेर यांनी २० डिसेंबर रोजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.
कार्ला येथील एकवीरा देवी हे महाराष्ट्रातील आगरी-कोळी लोकांची कुळदेवी आहे. उभ्या महाराष्ट्राला ज्ञात आहे की, आपलीदेखील ही कुळदेवी आहे. एकवीरादेवीवर असलेली ठाकरे घराण्याची श्रध्दा जगजाहिर आहे. आपण व आपला परिवार एकवीरा देवीच्या दर्शनाला नेहमीच येत असतात. शिवसैनिकांची ‘मॉ’ असलेल्या मिनाताई ठाकरे व कार्ला हे नाते, जिव्हाळा नेहमीच श्रध्देचा व जिव्हाळ्याचा विषय आहे. आपण एकवीरा देवीकडे जाता तळापासून गेल्यास आपणास एकवीरा देवीकडे जाणाऱ्या पायऱ्याची अवस्था कशी आहे ते निदर्शनास येईल. पायऱ्याची दुरवस्था झाली असून तुटल्याही असल्याचे मनोज मेहेर यांनी निवेदनातून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न केला आहे.
लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असणाऱ्या एकवीरा देवीच्या दर्शनासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून तसेच परदेशातूनही भाविक येत असतात. देवीकडे जाणाऱ्या मार्गावरील पायऱ्याची लवकरात लवकर डागडूजी होणे आवश्यक आहे. हा परिसर पुरातत्व खात्याच्या अखत्यारीत असला तरी लाखो भाविकांसाठी हा श्रध्देचा विषय आहे. आपण मुख्यमंत्री आहात, ही आपलीही कुळदेवी आहे. देवीकडे जाणाऱ्या मार्गावरील तुटलेल्या पायऱ्या ही भाविकांसाठी नाराजीची व संतापाची बाब आहे. आपण या ठिकाणी स्वत: आल्यास समस्येचे गांभीर्य आपल्या निदर्शनास येईल. आपण पुरातत्व खात्याच्या लोकांना घेवून या ठिकाणी संयुक्तरित्या पाहणी अभियान राबवून सत्य परिस्थितीचे अवलोकन केल्यास आपणास भाविकांना होणारा त्रास निदर्शनास येईल असे मनोज मेहेर यांनी निवेदनात म्हटले आहे.