नियमित फायर ऑडिट न करणाऱ्या शाळांना बजावली नोटीस
नवी मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेतर्फे ३० जानेवारी 2020 रोजी नवी मुंबई महानगरपालिका शिक्षण अधिकारी यांची भेट घेऊन नवी मुंबईतील नियमीत फायर ऑडिट न करणाऱ्या शाळांची यादी सादर केली होती, तसेच विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला गांभीर्याने न घेणाऱ्या शाळांवर कारवाई करण्याची मागणी मनविसेचे शहर अध्यक्ष सविनय म्हात्रे यांनी केली होती. या मागणीची दखल घेत नवी मुंबईतील शाळांना शिक्षण विभागातर्फे नोटीस बजावण्यात आली आहे.मा. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शासन निर्णय क्र. पीआरई-२००९/प्र.क्र.२९५/प्र.शि.-१, दि.२७ नोव्हेंबर २००९ व महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीव सुरक्षा उपाययोजना २००६ व २००९ नुसार महाराष्ट्रातील सर्व शाळा, महाविद्यालय, तसेच संस्थांनी आपल्या इमारतीमध्ये अग्निशामक यंत्र बसविणे व तसेच आग विजविणे यंत्रणा अद्यायावत ठेऊन वर्षातून दोन वेळा त्याची नियमित तपासणी करणे “Fire Audit/ Resolution of Structural Aspect of Building” बंधनकारक आहे. परंतु नवी मुंबईतील बहुतांश शाळांमध्ये अग्निशामक यंत्र अद्यापही बसविण्यात आलेले नव्हते. तसेच काही शिक्षण संस्थांनी वर्षानुवर्षे संबंधित फायर ऑडिट केलेले नव्हते अशा जवळपास १५० शाळांची यादी मनविसेचे शहर अध्यक्ष सविनय म्हात्रे यांनी शिक्षण अधिकाऱ्यांकडे सादर केली होती व सदर शाळांवर कारवाई करण्याची मागणी त्यावेळी उपशहर अध्यक्ष संदेश डोंगरे यांनी केली होती.याबाबतीत सतत पाठपुरावा करून शिक्षण अधिकारी यांना वेळोवेळी धारेवर धरण्यात आले होते व या गंभीर विषयाबाबत तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा उपशहर अध्यक्ष संपरित तुर्मेकर व शहर सचिव निखिल गावडे यांनी दिला होता. मनविसेच्या प्रयत्नांना यश आले असून मनविसेच्या दणक्यानंतर शिक्षण विभागातर्फे नवी मुंबईतील सर्व शाळांना अग्निशमन यंत्रणा बसविणे व नियमित फायर ऑडिट करण्यासंबंधी नोटीस बजावण्यात आली. तरीही नोटीशीनंतर शाळांनी हे प्रकरण गांभीर्याने न घेतल्यास पुढची धडक कारवाई शाळांवर करण्यात येईल असा इशारा मनविसेच्या शिष्टमंडळाने दिला आहे,यावेळी शिष्टमंडळात उपशहर अध्यक्ष –दशरथ सुरवसे, शहर सचिव प्रेम दुबे,सहसचिव निखिल थोरात, प्रशांत पाटेकर उपस्थित होते.