नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील कृषी मालाच्या कांदा बटाटा, फळ आणि भाजी मार्केटचे गड अपेक्षेप्रमाणे दिग्गजांनी राखले. फळ मार्केटमधून यापूर्वीच संजय पानसरे बिनविरोध निवड झाली होती. कृषी मालाच्या भाजी मार्केटमधून शंकर पिंगळे तर कांदा बटाटा मार्केटमधून अशोक वाळूंज हे विजयी झाले. मार्केट आवारातील मातब्बरांनी अशोक वाळूंजांच्या विरोधात धनशक्तीचा वापर करून तसेच तुर्भेतील मातब्बर राजकीय घटकांनी आपली सर्व ताकद पणाला लावूनही अशोक वाळूजांनी मिळविलेला विजय सहकार क्षेत्रात चर्चेचा विषय बनला आहे. फळ मार्केटचे संजय पानसरे व भाजी मार्केटचे शंकर पिंगळे हे सलग दोनदा विजयी झाले असले तरी कांदा बटाटा मार्केटमधून अशोक वाळूंज यांनी सलग तिसऱ्यांदा विजय मिळवित हॅट्रीक मिळविली आहे. बाजार समितीच्या कृषी क्षेत्रातील बाजारपेठात सलग तीन वेळा विजयी होणारे अशोक वाळूंज हे एकमेव संचालक ठरले आहेत. याशिवाय ते महाराष्ट्र राज्य बाजार समिती महासंघावरही सलग दोनवेळा संचालक म्हणून निवडून आले आहेत.
भाजी मार्केटमधील शंकर पिंगळे यांनी के.डी.मोरे यांचा ४६५ मतांनी दणदणीत पराभव करत भाजी मार्केटमध्ये आपणच प्रभावी असल्याचे पुन्हा एकवार दाखवून दिले. दुसरीकडे कांदा बटाटा मार्केटमध्ये निवडणूक जाहिर झाल्यापासून घडलेल्या विविध घडामोडींमुळे अशोक वाळूजांचे काय होणार, याच एकमेव चर्चेला उधाण आले होते. अशोक वाळूंज यांनी मुळातच कांदा बटाटा मार्केटची निवडणूक लढवूच नये यासाठी नवी मुंबईतील मार्केट आवारानजीकच्या एका मातब्बर राजकीय घराण्यांतील पुढाऱ्याकडून कमालीचा दबाव येत गेला. या पुढाऱ्याला निवडणूक लढवून बाजार समितीवर कांदा बटाटा मार्केटवर संचालक म्हणून जायचे होते. हा पुढारी निवडणूकीला उभा राहीला असता तर कदाचित कांदा बटाटा मार्केटची निवडणूकही बिनविरोध झाली असती. तथापि या राजकीय पुढाऱ्याच्या दबावाला भीक न घालता खमक्या स्वभावाच्या अशोक वाळूंजांनी निवडणूक लढविणारच असा निर्धार जाहीर केला. अशोक वाळूजांना दुर्देवाने कोणा परक्याच्या विरोधात नाही तर आपलेच जवळचे नातलग असलेल्या राजेंद्र शेळकेंच्या विरोधात निवडणूक लढवावी लागली. अशोक वाळूंज यांना संचालक निवडणूकीच्या माध्यमातून मार्केट आवारातूनच संपविण्यासाठी अशोक वाळूंज विरोधात सर्व असे चित्र कांदा बटाटा मार्केट आवारात निर्माण झाले. राजेंद्र शेळकेच्या पाठीमागे त्या राजकीय पुढाऱ्याची ताकद, वडगाव काशिबेंगच्या काही घटकांनी केलेला प्रतिष्ठेचा विषय या पार्श्वभूमीवर अशोक वाळूजांच्या पराभवावरही कांदा बटाटा मार्केटमध्ये पैजा लागल्या गेल्या. काल रात्रीपर्यत अशोक वाळूंज आपल्या विजयावर ठाम होते. फक्त मताधिक्य ९० ते १२५ राहील असा दावा अशोक वाळूंज यांच्याकडून करण्यात येत होता.
कांदा बटाटा मार्केटची मतमोजणी सुरूवात झाल्यावर काही काळ राजेंद्र शेळके आघाडीवर होते. ही आघाडी नगण्य होती. तथापि शेवटी अशोक वाळूजांनी आघाडी घेत १०५ मतांनी राजेंद्र शेळकेंना पराभूत केले.
अशोक वाळूंज यांना मार्केट आवारात नाना, टायगर, आमदार अशा विविध नावांनी संबोधले जात असून सलग तीनवेळा मार्केटमध्ये ते संचालक म्हणून निवडून आले आहेत. या विजयामुळे सर्व विरोधक एकत्र येवुनही अशोक वाळूजांचा पराभव करू न शकल्याने अशोक वाळूजांची सहकारातील ताकद वाढीस लागली आहे. ज्या राजकीय घराण्यांसाठी अशोक वाळूजांनी आपली उभी हयात घालविली, त्याच राजकीय घराण्यांने अशोक वाळूंजांना पराभूत करण्यासाठी ताकद पणाला लावल्याचे नवी मुंबईकरांना जवळून पहावयास मिळाले.