नवी मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मातब्बर नेते, माथाडी नेते व पश्चिम महाराष्ट्रातील एक आक्रमक नेतृत्व असणाऱ्या शशिकांत शिंदेंकडे नवी मुंबईतील राष्ट्रवादी कॉंग्रेसची धुरा सोपविण्यात आली आहे. त्यांचे पुत्र तेजस शिंदे हे नवी मुंबई युवक राष्ट्रवादी कॉंग्रेसचे निरीक्षक असून त्यांना पालिका निवडणूकीच्या माध्यमातून महापालिका सभागृहात पाठविण्यासाठी जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. एकीकडे प्रभाग ६३ मधून तेजस शिंदेंसाठी राष्ट्रवादीच्या एका गटाकडून चाचपणी सुरू असतानाच दुसरा गट मात्र तेजस शिंदेंचे सध्या निवासी वास्तव्य असलेल्या प्रभाग ८५ मधून तेजस शिंदेंना निवडणूकीला उभे करण्यासाठी जोरदार हालचाली करू लागला आहे. भाजपमधील वरिष्ठ सूत्रे राष्ट्रवादीच्या हालचालीवर लक्ष ठेवून असले तरी भाजपच्या सुरज पाटलांना नेरूळ पश्चिमेला हालचालींना फारसा वाव मिळू नये म्हणून तेजस शिंदेसारखा मातब्बर मोहरा निवडणूक रिंगणात उतरवून त्यांना प्रभागातच अडकविण्याची रणनीती महाआघाडीकडून खेळली जात आहे.
माथाडी गटाशी संबंधित घटक यापूर्वीही नवी मुंबई महापालिका सभागृहात नगरसेवक म्हणून सहभागी झाले आहेत. आनंदराव शिवाजीराव पाटील, रवी पाटील, भारती पाटील, शंकर मोरे अशी विविध नावे असतानाच आता तेजस शिंदेंचे नावही काही दिवसापासून निवडणूक रिंगणात चर्चेला येत आहे.
प्रभाग ६३ मध्ये तेजस शिंदेंचा अधिकाधिक काळ गेला असला तरी त्यांच्यासाठी येथे निवडणूक जिंकणे अवघड असल्याचे मत राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांकडून मांडले जात आहे. त्यातच कॉंग्रेसचे नवी मुंबई अध्यक्ष अनिल कौशिक यांचा हा मतदारसंघ ओळखला जात आहे. भाजपच्या संपत शेवाळे हे त्यांना निवडणूकीत मात देत असले तरी पराभवानंतरही या प्रभागात आपला जनसंपर्क व मोर्चेबांधणी अनिल कौशिकांनी कायम ठेवलेली आहे. त्यामुळे अनिल कौशिक हा प्रभाग सोडणे शक्य नाही. आधीच नेरूळ नोडमध्ये नवी मुंबई इंटकचे अध्यक्ष रवींद्र सावंत यांनी मागितलेल्या प्रभागात शिवसेनेचा नगरसेवक आहे. परंतु हा शिवसेनेचा नगरसेवक बाजूच्या प्रभागातून निवडणूक लढविणार असल्याची जोरदार चर्चा असल्याने रवींद्र सावंत व कॉंग्रेसने याच मतदारसंघावर जोरदार दावा केला आहे. सानपाडा ते नेरूळ पश्चिम कॉंग्रेसला एकही मतदारसंघ नसल्याने रवींद्र सावंतसाठी कॉंग्रेसने प्रतिष्ठा पणाला लावलेली आहे. एकीकडे नेरूळचा मतदारसंघ रवींद्र सावंतांमुळे महाविकासआघाडीसाठी डोकेदुखी ठरलेला असतानाच आता थेट कॉंग्रेस नवी मुंबई अध्यक्ष अनिल कौशिक यांच्याच मतदारसंघात राष्ट्रवादीकडून तेजस शिंदेंसाठी काही घटक चाचपणी करू लागल्याने कॉंग्रेसच्या वर्तुळात संताप व्यक्त केला जावू लागला आहे.
अनिल कौशिकांमुळे प्रभाग ६३ मधून तेजस शिंदेंना उमेदवारी मिळणे अवघड असल्याचे जवळपास निश्चित समजले जात आहे. हा प्रभाग मिश्र भाषिकांचा प्रभाग आहे. सातारच्याच संपत शेवाळेंचा हा बालेकिल्ला आहे. गणेश नाईकांचे निकटवर्तीय असलेल्या भरत नखातेंचीही या प्रभागात मागील निवडणूकीत डाळ शिजली नव्हती. त्यातच येथील गुजराती व अन्य अमराठी भाषिकांमध्ये भाजपचे विशेषत: मोदींचे आजही आकर्षण असल्याने तेजस शिंदेंसाठी पहिल्याच प्रयत्नात पराभवाचा शिक्का लागू नये म्हणून राष्ट्रवादीमधील काही घटक नेरूळमधील प्रभाग ८५ ची जोरदार चाचपणी करत असल्याची माहिती माथाडी भवनमधील सूत्रांनी दिली. तेजस शिंदेंसाठी राष्ट्रवादीने ८५चा दावा केल्यास महाआघाडीतून कोणीही विरोध करण्याची शक्यता आहे.
प्रभाग ८५ मधील मतांची बेरीज पाहता हा मतदारसंघ तेजस शिंदेसाठी अनुकूल असल्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील शशिकांत शिंदेसमर्थकांचे म्हणणे आहे. सिडको वसाहती व साडे बारा टक्के मधील पश्चिम महाराष्ट्रातील मतदार पाहता हाच प्रभाग तेजस शिंदेंना अनुकूल असल्याचे तसेच शिवसेना व कॉंग्रेसही तेजस शिंदेसाठी सर्वस्व झोकून देण्याची शक्यता राष्ट्रवादीच्या काही घटकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
महाविकास आघाडीकडून तसेच शशिकांत शिंदेकडून याबाबत कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आली नसली तरी शशिकांत शिंदे यांचे अतिउत्साही समर्थक प्रभाग ८५ मधील घडामोडी तेजस शिंदेंना अनुकूल असल्याचे राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना पटवून देत आहे. नेरूळ पश्चिमेला असलेल्या ८ प्रभागापैकी किमान ७ प्रभागांमध्ये सुरज पाटील भाजपचे उमेदवार निवडून आणण्यात यशस्वी ठरतील, असा पहिल्या टप्प्यात अंदाज व्यक्त होत असून त्यांना त्यांच्याच प्रभागात अडकवून ठेवण्यासाठी आणि सुरज पाटलांच्या माध्यमातून गणेश नाईकांच्या रणनीतीला खिळ बसविण्यासाठी अंतिम टप्प्यात तेजस शिंदेंना अंतिम क्षणी महाआघाडी निवडणूक रिंगणात उतरवणार असल्याचे बोलले जात आहे. प्रभाग ८६, ९४, ९५ हे भाजपकडे असलेले प्रभाग अंर्तगत गटबाजीमुळे महाविकासआघाडीला मिळण्याची शक्यता स्थानिक भागात व्यक्त केली जात असतानाच नेरूळ पश्चिमेकडील आठही प्रभागावर सत्तेच्या दृष्टीने विजय मिळविण्यासाठी महाविकासआघाडीने कंबर कसली असून सुरज पाटलांसारखा मोहरा प्रभागातच अडकवून ठेवण्यासाठी महाआघाडीकडे तेजस शिंदेसारखा ताज्या दमाचा व युवकांमध्ये लोकप्रिय उमेदवार नसल्याने तेजस शिंदेंवर शिक्कामोर्तब होंण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तेजस शिंदे येथे निवडणूकीत उतरल्यास पश्चिम महाराष्ट्रातील युवक मोठ्या प्रमाणावर तेजस शिंदेंच्या विजयासाठी येथे तळ ठोकतील असे शिंदे समर्थकांकडून सांगण्यात येत आहे.