अॅड. महेश जाधव : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : धन्वंतरीचे पुजारी म्हणून पुजल्या जाणाऱ्या आरोग्य यंत्रणाच कोरोनाच्या सावटाखाली भीतीच्या विळख्यात वावरत असेल तर नवी मुंबईकर कोरोनापासून कितपत स्वत:चा बचाव करणार हे चित्र नवी मुंबई महापालिका कार्यक्षेत्रात पहावयास मिळत आहे. महापालिकेच्या राबाडा नागरी आरोग्य केंद्रात दोन कोरोना रूग्ण आढळल्यावर आज नेरूळ फेज-१ मध्ये तब्बल ८ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट होताच आरोग्य कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
मंगळवारी राबाडा नागरी आरोग्य केंद्रात काम करणाऱ्या महिला आरोग्य सहाय्यक व नवी मुंबई महापालिका परिवहन उपक्रमाचे तिकिट तपासनीस यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. सध्या परिवहन उपक्रमाच्या बसेस रस्त्यावर फारशा धावत नसल्याने पालिका प्रशासनाने आरोग्य विभागात कर्मचाऱ्यांची कमतरता लक्षात घेवून परिवहनच्या कर्मचाऱ्यांना नागरी आरोग्य केंद्रात मदतीसाठी पाठविले आहेत. त्यातील तिकिट तपासनीस म्हणून परिवहनमध्ये कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांला कोरोनाची लागण झाली आहे. संबंधित महिला आरोग्य सहाय्यक व तिकिट तपासनीस यांच्यावर वाशीतील रूग्णालयात उपचार सुरू आहेत. राबाडा नागरी आरोग्य केंद्रातील सर्व कर्मचारी हे संबंधित दोन्ही कोरोना रूग्णांच्या संपर्कात गेल्या ८ दिवसापासून असल्याने संबंधित सर्व कर्मचाऱ्यांनी स्वत:ला होम कोरन्टाईन करण्याबाबत आरोग्य केंद्र प्रमुखांकडे मागणी केली. तथापि या कर्मचाऱ्यांची मागणी फेटाळण्यात आली. कर्मचाऱ्यांनी मेल व व्हॉटसअपचा आधार घेत कोरोनापासून काळजी घेण्यासाठी आपण होम कोरन्टाईन होत असल्याचे आरोग्य केंद्र प्रमुखांना कळविलेही. काही मोजक्या कर्मचाऱ्यांचा अपवाद वगळता इतर कर्मचारी आज नागरी आरोग्य केंद्रात कामावर आले नाही. प्रमुखांनी त्यांना आज तुमच्या कुटूंबियांसहीत इनस्टिट्यूटल कोरन्टाईन होन्याचा निरोप पाठविला. वास्तविक आरोग्य खात्याच्या मंत्रालयीन मार्गदर्शक सूचीनुसार या कर्मचाऱ्यांना प्रशासनाने घरी जावून त्यांना इथे आणून उपचार करणे आवश्यक आहे. ते स्वत: त्यांच्या परिवारासहीत नवी मुंबईत आल्यास अथवा प्रवास केल्यास कोरोनाचा उद्रेक वाढण्याची भीती आहे. नवी मुंबईतील आरोग्य खात्यात कोरोनाची कर्मचाऱ्यांना लागण होण्याचे प्रमाण वाढीस लागल्याचे व मंत्रालयीन पातळीवरही समजले असून लवकरच गंभीर दखल घेतली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
नेरूळ पूर्वेला असलेल्या पालिकेच्या नागरी आरोग्य केंद्रात २० कर्मचारी कार्यरत असून आज त्यातील तब्बल ८ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समजताच आरोग्य खात्यातील कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. आम्हीच कोरोनापासून सुरक्षित नाही तर रूग्णांवर काय उपचार करणार व आमच्यामुळे आमच्या घरच्यांच्या जिविताला आम्ही संकटात टाकणार असा भीतीचा सूर आता कर्मचाऱ्यांकडून आळविला जावू लागला आहे. या ८ कोरोनाग्रस्तांमध्ये परिचारिका, महिला आरोग्य सहाय्यिका, मावशी, स्वयंसेवक यांचा समावेश आहे.
मुंबई महापालिका प्रशासनाने आपल्या कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्यास त्यांच्या उपचारासाठी हॉटेल्स व इतरत्र स्वतंत्र व्यवस्था केलेली आहे. या धर्तीवर नवी मुंबई महापालिकेने स्वतंत्र उपचार यंत्रणा उभी करण्याऐवजी त्यांना अन्य रूग्णांसमवेत वाशी अथवा रसायनीला ठेवले जात असल्याचा संताप आरोग्य कर्मचाऱ्यांकडून व्यक्त केला जात आहे. यापूर्वी तेरणा, डीवायपाटील, अपोलो यासह अन्य रूग्णालयीन कर्मचाऱ्यांत कोरोनाचे रूग्ण सापडत होते, पण आता महापालिका आरोग्य यंत्रणेतच कोरोना रूग्ण सापडू लागल्याने आरोग्य यंत्रणेतील कर्मचारी कोरोनाच्या भीतीखाली वावरू लागले आहेत. नवी मुंबईतील काही घटकांनी ही बाब मंत्रालयीन पातळीवर कळविली असून लवकरच याची दखल घेण्यात येवून आरोग्य कर्मचारी व इतर कर्मचाऱ्यांची काळजी घेण्याबाबत पालिका प्रशासनाला निर्देश मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.