
निलेश मोरे
- संक्रमण शिबिराची दुरुस्ती
- थकीत भाडे व एसआरए बांधकाम सुरू करण्याबाबत प्रभाग समिती अध्यक्ष परमेश्वर कदम यांचे झोपू प्राधिकरनाच्या मुख्य अधिकाऱ्यांना पत्र
घाटकोपर : पूर्वेतील कामराज नगर येथील संक्रमण शिबिरात राहणाऱ्या रहिवाशांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत असून गेल्या ७ वर्षांपासून रहिवाशी एसआरए अंतर्गत बांधण्यात येणाऱ्या आपल्या हक्काच्या घराच्या प्रतीक्षेत आहेत. पूर्वेतील संत नामदेव एस आर ए सहकारी गृहनिर्माण संस्था मर्याचा एसआरए अंतर्गत विकास होणार असून सन २०१३ मध्ये रहिवाशांनी झोपू प्राधिकरणा अंतर्गत त्यांची जागा आर्यमन डेव्हलपर्स या विकासकाला देण्यात आली आहे. परंतु ७ वर्ष उलटून ही सोसायटीचे बांधकाम पूर्ण झाले नाही. गेल्या १० ते १२ महिन्यापासून विकासकाने बांधकाम पूर्ण बंद ठेवले आहे.
गेल्या ७ वर्षांपासून रहिवाशी घराची प्रतीक्षा करत संक्रमण शिबिरात स्थलांतरित झाले आहेत. मात्र संक्रमण शिबिराची दुरवस्था झाली असून आतील उदवाहन सेवा गेल्या आठ महिन्यापासून बंद आहे. राहिवाशांसाठी असलेल्या पिण्याच्या पाण्याच्या टाकीच्या बाजूने सांडपाणी आणि शौचालयाचे सांडपाणी वाहत आहे. तसेच नेताजी नगर येथील संक्रमण शिबिराकडे जाणारा पर्यायी रस्त्याची दुरवस्था झालेली आहे.
रात्रीच्या वेळेस शिबिराच्या मागे गांजा व दारू पिणारे गर्दुल्ले राजरोसपणे हैदोस घालत असल्याने राहिवाशी त्रस्त झाले आहे. काही महिन्यांपासून एसआरए चे काम बंद असून मागील दोन वर्षापासून विकासकाने रहिवाशांना भाडे देखील दिलेले नाही. याबाबत रहिवाशांनी स्थानिक नागरसेवक , एन वार्ड पालिकेचे प्रभाग समिती अध्यक्ष परमेश्वर कदम यांची भेट घेऊन आपली समस्या मांडली असता परमेश्वर कदम यांनी झोपडपट्टी पुनवर्सन प्राधिकरणचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पत्र देत एसआरए इमारतीचे बांधकाम त्वरित सुरू करण्यासाठी विनंती केली आहे. सदर पत्रात विकासकाकडून रहिवाशाना थकीत भाडे मिळावे तसेच संक्रमण शिबिराची दुरुस्ती आणि लगतचा परिसर व रस्ता सुधारण्याबाबत विनंती करण्यात आल्याचे प्रभाग समिती अध्यक्ष परमेश्वर कदम यांनी सांगितले.