
कॉंग्रेस प्रवक्ते रवींद्र सावंत यांचा सायन-पनवेल हायवेला ‘रास्तारोको’
Navimumbailive.com@gmail.com- ९८२००९६५७३
नवी मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी केलेल्या धक्काबुक्कीचे पडसाद नवी मुंबईत उमटले. नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेसचे प्रवक्ते व नवी मुंबई इंटकचे अध्यक्ष रवींद्र सावंत यांनी कॉंग्रेसच्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांसमवेत सायन-पनवेल महामार्गावर काही काळ ‘रास्ता रोको’ करत वाहतुक अडविली.
काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी केलेल्या धक्काबुक्कीचे वृत्त नवी मुंबईत पसरताच कॉंग्रेस कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांकडून संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या. कॉंग्रेस कार्यकर्ते व पदाधिकारी हे नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेसचे प्रवक्ते रवींद्र सावंत यांच्या नेरूळ येथील कार्यालयाजवळ जमू लागले. कोरोना संकट पाहता निवडक कार्यकर्ते व पदाधिकारी घेवून रास्ता रोको करण्याचा निर्णय रवींद्र सावंत यांनी घेतला. सांयकाळी ६ वाजण्याच्या सुमारास रवींद्र सावंत जुईनगर-शिरवणे येथील सायन-पनवेल महामार्गावर कॉंग्रेसच्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांसमवेत उतरले. पनवेलहून सायनच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी काही काळ वाहतुक अडविली. कॉग्रेस कार्यकर्ते व पदाधिकारी घोषणाबाजी करत उत्तर प्रदेशातील घडलेल्या घटनेचा निषेध करत कॉंग्रेस जिंदाबादचा सतत नारा देत होते. सांयकाळची रहदारीची वेळ व त्यात कॉंग्रेसचे ‘रास्ता रोको’ यामुळे लांबवर वाहतुक कोंडी झाली.
नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेसचे प्रवक्ते व नेरूळ तालुका कॉंग्रेसचे अध्यक्ष रवींद्र सावंत यांच्या नेतृत्वाखालीनेरूळ तालुका कॉंग्रेसचे उपाध्यक्ष प्रल्हाद गायकवाड, दिनेश गवळी, फारूक अत्तार, कॉंग्रेसच्या नवी मुंबई जिल्हा सचिव विद्या भांडेकर, शेवंता मोरे, बबीन मॅथ्यू व विजय पगारे, राहुल कापडणे, तुकाराम महाराज, विनय कांबळे, आदित्य सूर्यवंशी, श्रीराम पंधिरे, संग्राम इंगळे, सुरेश सदावर आदींनी रस्त्यावर उतरून कॉंग्रेस जिंदाबादच्या घोषणा देत वाहतुक अडवून धरली. राहूल गांधी व प्रियंका गांधींना उत्तर प्रदेश पोलिसांनी केलेल्या धक्काबुक्कीच्या निषेधार्थ रवींद्र सावंत व सहकाऱ्यांनी केलेल्या रास्ता रोकोची कॉंग्रेसच्या प्रदेश पातळीवरही दखल घेण्यात आली आहे.