
पनवेल: सिडकोच्या दुर्लक्षितपणामुळे करंजाडे शहराचा विकास खुंटल्याने नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे. सिडको अधिकारी, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, आरोग्य विभागाने तोंडाला पाने पुसली आहेत. त्यामुळे आशेचा एकमेव किरण असलेल्या पनवेल संघर्ष समितीला तेथील रहिवाशांनी साद घातली आहे. मूलभूत समस्या मुक्त करंजाडे करण्याचे आश्वासन त्यांना समितीचे अध्यक्ष कांतीलाल कडू यांनी दिले आहे.
करंजाडे येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनात काल करंजाडे रहिवाशांची संघर्ष समितीसोबत बैठक झाली.
शहरातील अंतर्गत रस्ते, मल: निस्सारण व्यवस्था, पथदिवे, सार्वजनिक शौचालय, नालेसफाई, गार्डन सुशोभीकरण, नाना-नानी पार्क, बिकट बनलेला कमी दाबाचा पाणी प्रश्न, बंद असलेले प्राथमिक आरोग्य सेवा केंद्र, विद्युत शववाहिनी आणि स्मशानभूमीचा किचकट बनलेला प्रश्न आदी महत्वाच्या विषयांबाबत सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत गुजर यांनी उहापोह केला.
सिडकोकडे फेब्रुवारीमध्ये आपण हे प्रश्न मांडले असून नवीन पनवेलचे अधीक्षक सीताराम रोकडे यांच्याकडून करंजाडेच्या समतोल विकासाकरिता तब्बल 38 कोटी रुपयांची कामे मंजूर करून घेतले असल्याची माहिती पनवेल संघर्ष समितीचे अध्यक्ष कांतीलाल कडू यांनी दिली.
फेब्रुवारीला विकास कामांना मंजुरी मिळाली आहे. त्यासंदर्भात पुढील प्रक्रिया सुरू होणार इतक्यात कोरोनाने घाला घातला. परिणामी सगळीच कामे खोळंबली आहेत. आता आपण सर्व जण मिळून पुन्हा सिडकोकडे पुढच्या आठवड्यात बैठक घेवून ही विकास कामे मार्गी लावू, अशी ग्वाही कडू यांनी उपस्थितांना दिली.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे मुख्य अधीक्षक अभियंता सूर्यवंशी आणि सिडकोचे मुख्य अभियंता गजानन दलाल यांच्यासोबत कोरोना काळात ऑनलाईन बैठक घेवून करंजाडे आणि नवीन पनवेल शहराच्या पाणी प्रश्नांविषयी मार्ग काढला आहे, त्याचा परिणाम आपल्याला लवकरच दिसून येईल आणि सुरळीत पाणी पुरवठा होईल असेही कडू यांनी सांगितले.
38 कोटी रुपयांच्या कामातून अंतर्गत रस्ते, गार्डन, नालेसफाई आणि सुनियोजित विकास साधण्याचा आपला प्रयत्न राहील असेही कडू यांनी सांगितले.
स्मशानभूमी आणि विद्युत शववाहिनीचा मुद्दा नव्याने समोर आला आहे. सिडकोकडून तो मंजूर करून घेवू किंवा खासगी विकसकांचे योगदान घेवून हा प्रश्न निकाली काढण्यात येईल, असेही कडू यांनी उपस्थितांना आश्वासित केले.
प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू करण्यासंदर्भात सिडकोचे सह संचालक अश्विन मुदगल आणि रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांच्याशी सविस्तरपणे चर्चा केली आहे. ते दोन्ही उच्च पदस्थ अधिकारी सकारात्मक असल्याने तो सुद्धा प्रश्न मार्गी लागेल आणि करंजाडे शहर, गाव नव्या विकासाच्या संकल्पनेतून तेजाने न्हावून काढू अशी भक्कम आणि शाश्वत ग्वाही कांतीलाल कडू यांनी दिली.
चर्चेत चंद्रकांत गुजर, सईताई पवार, सुभाष राले, संकेत कराले, संजय सुरगुडे, जीजाभाऊ दाते, देविदास पाटील, प्रविण जाधव , विजय बाविस्कर, विकास गांजळे, मेटे आदींनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेवून समस्यांचा पाढा वाचला. याप्रसंगी पनवेल संघर्ष समितीचे पनवेल शहर अध्यक्ष गणेश वाघिलकर उपस्थित होते.