संपादक : सौ. सुवर्णा खांडगेपाटील
बातमीसाठी संपर्क : ८३६९९२४६४६ : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : संपूर्ण देशभरात अत्यंत उत्साहात संपन्न होणारा नवरात्रौत्सव यावर्षी शासनाने जाहीर केलेल्या कोव्हीड सुरक्षा नियमावलीच्या मर्यादेत नवी मुंबईमध्ये तशाच उत्साहात संपन्न झाला. नवरात्रौत्सवानंतर विजयादशमीच्या दिवशी होणारी उत्सवाची सांगता सुव्यवस्थित रितीने व्हावी याकरिता महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत सर्व व्यवस्था श्रीगणेशोत्सवाप्रमाणेच सुसज्ज ठेवण्यात आली होती. कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने सर्व ठिकाणी पोलीस बंदोबस्तही चोख होता. त्यामुळे सर्वच २२ मुख्य विसर्जनस्थळांवर घरगुती घट आणि घरगुती व सार्वजनिक मंडळांच्या श्रीदुर्गामूर्ती अशा ८६४ दुर्गादेवींचे विसर्जन सुव्यवस्थित रितीने संपन्न झाले.
यामध्ये बेलापूर विभागात ५ विसर्जन स्थळांवर २५ घरगुती व ६६ सार्वजनिक, नेरुळ विभागात २ विसर्जन स्थळांवर ५५ घरगुती व २५ सार्वजनिक, वाशी विभागात २ विसर्जन स्थळांवर ७१ घरगुती व १२ सार्वजनिक, तुर्भे विभागात ३ विसर्जन स्थळांवर ७४ घरगुती व २९ सार्वजनिक, कोपरखैरणे विभागात २ विसर्जन स्थळांवर १२६ घरगुती व १६ सार्वजनिक, घणसोली विभागात ४ विसर्जन स्थळांवर १२१ घरगुती व १८ सार्वजनिक, ऐरोली विभागात ३ विसर्जन स्थळांवर ३३ घरगुती व १६ सार्वजनिक आणि दिघा विभागात १७१ घरगुती व ६ सार्वजनिक अशा एकूण ६७६ घरगुती व १८८ सार्वजनिक अशा प्रकारे एकूण ८६४ दुर्गादेवींना भवानीमातेचा व अंबामातेचा गजर करीत भावपूर्ण निरोप देण्यात आला.
सर्वच २२ विसर्जनस्थळांवर सुरक्षेच्या दृष्टीने बॅरेकेटींग करण्यात आले होते. लाईफगार्डस्, स्वयंसेवक यांच्यासह अग्निशमन दल कार्यरत होते. मूर्तींच्या सुयोग्य विसर्जनासाठी तराफ्यांची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच पुरेशा विद्युत व्यवस्थेसह जनरेटरची पर्यायी व्यवस्था करण्यात आली होती. त्याठिकाणी पिण्याच्या पाण्यासह प्रथमोपचाराची सुविधाही उपलब्ध करुन देण्यात आली होती. दोन्ही परिमंडळाचे उपआयुक्त हे सर्व विभागांच्या सहा. आयुक्त तथा विभाग अधिकारी यांचे समवेत संपूर्ण स्थितीवर लक्ष ठेवून होते.
सर्व विसर्जनस्थळांवर ओल्या व सुक्या निर्माल्यासाठी दोन स्वतंत्र निर्माल्य कलश ठेवण्यात आले होते व नागरिकांना त्याची माहिती देण्यात येत होती. एकूण १७ टन ५६५ किलो ओले निर्माल्य जमा करण्यात आले असून त्याची वाहतुक स्वतंत्र निर्माल्य वाहनाद्वारे करण्यात आली. घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त व अधिकारी याविषयी दक्ष होते. सदर निर्माल्याची विल्हेवाटही पावित्र्य जपत स्वतंत्रपणे लावली जात आहे. महानगरपालिकेच्या संबंधित विभाग कार्यालयांमार्फत करण्यात आलेली व्यवस्था आणि पोलीस विभागाची दक्ष नजर तसेच नागरिकांचे लाभलेले सहकार्य यामुळे श्रीदुर्गादेवींचा विसर्जन सोहळा शांतता आणि सुव्यवस्थेत संपन्न झाला.