संपादक : सौ. सुवर्णा खांडगेपाटील : ९९६७७७१७८०
बातमीसाठी संपर्क : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : कोव्हीडच्या दुसऱ्या लाटेची तीव्रता कमी होत असल्याचे लक्षात घेऊन २० ऑक्टोबरपासून महाविद्यालये खुली झाली असून कोव्हीड लसीचे २ डोस घेतलेल्या विद्यार्थ्यांना वर्गात प्रवेश दिला जात आहे. या अनुषंगाने कोव्हीड लसीचा पहिला वा दुसरा डोस घेणे बाकी असलेल्या विद्यार्थ्यांना सुलभपणे तो घेता यावा याक रिता महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील टप्प्याटप्प्याने सर्व महाविद्यालयांमध्ये विशेष लसीकरण सत्रांचे २२ ऑक्टोबर पासून आयोजन करण्यात येत आहे.
या विशेष लसीकरण सत्राच्या पहिल्या टप्प्यात २२ ऑक्टोबर रोजी १० महाविद्यालयांमध्ये सकाळी ९ ते ५ या वेळेत विशेष लसीकरण सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये (१) टिळक एज्युकेशन सोसायटी, एस.के. कॉलेज, सेक्टर २५ नेरुळ, (२) आयसीएल कॉलेज, सेक्टर ९ ए, वाशी, (३) वाय.सी. कॉलेज, सेक्टर १५, कोपरखैरणे, (४) टिळक कॉलेज, सेक्टर २८, वाशी, (५) स्टर्लिंग कॉलेज, सेक्टर १९ नेरुळ (६) तेरणा इंजिनिअरिंग कॉलेज, सेक्टर २२, नेरुळ (७) मॉर्डन कॉलेज, सेक्टर १६ ए वाशी (८) शेतकरी शिक्षण संस्था विद्यालय आणि ज्युनियर कॉलेज घणसोलीगांव (९) भारती विद्यापीठ, सेक्टर ३, सीबीडी बेलापूर (१०) इंडियन एरोस्पेस आणि इंजिनियरिंग कॉलेज, तुर्भे एम.आय.डी.सी. अशा १० महाविद्यालयांचा समावेश आहे.
महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभाग आणि उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या वतीने “मिशन युवा स्वास्थ्य” राबविण्यात येत असून २५ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर या कालावधीत ही मोहिम सर्व महाविद्यालयांमध्ये राबविली जात आहे. नवी मुंबई महानगरपालिकेने या मोहिमेची सुरुवात या आधीच २२ ऑक्टोबरपासून सुरु केली असून पहिला कोव्हिशिल्ड डोस तसेच ज्या लाभार्थ्यांनी पहिला कोव्हिशिल्ड डोस घेऊन ८४ दिवसाचा कालावधी पूर्ण झाला असेल त्यांना कोव्हिशिल्डचा दुसरा डोस व अशाचप्रकारे ज्यांनी कोव्हॅक्सिनचा पहिला डोस घेतला असेल त्यांना २८ दिवसानंतर कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस दिला जाणार आहे. या मोहिमेमध्ये कॉलेजमधील विद्यार्थ्यांप्रमाणेच प्राध्यापक, प्राध्यापिका आणि इतर कर्मचारी यांचेही लसीकरण केले जाणार आहे.
नजीकच्या कालावधीत महाविद्यालय पूर्ण क्षमतेने सुरु होण्याच्या दृष्टीने अधिक सक्रीय आणि जास्त गतीशील असणारा महाविद्यालयीन वयोगट लस संरक्षित व्हावा ही या विशेष लसीकरण सत्रामागील भूमिका आहे. अधिक जोखीम घेण्याचे वर्तन असलेला हा वयोगट असल्याने व त्यामुळे संसर्ग होण्याची शक्यता जास्त असल्याने हा वयोगट पूर्ण संरक्षित व्हावा व कोव्हीड १९ च्या प्रसारावर नियंत्रण मिळावे हा मिशन युवा स्वास्थ्य मोहिमेमागील उद्देश आहे.
सदर मिशन यशस्वीपणे राबविण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेने संपूर्ण तयारी केली असून याकरिता आवश्यक लस साठा उपलब्ध आहे. याबाबत महानगरपालिकेच्या सर्व नागरी आरोग्य केंद्रांचे वैद्यकीय अधिकारी यांना निर्देश देण्यात आलेले असून त्यांच्या क्षेत्रातील महाविद्यालयीन लसीकरणावर त्यांचे नियंत्रण असणार आहे. सदर मोहिम प्रभावीपणे राबविण्यासाठी सर्व महाविद्यालयाच्या प्राचार्यांना पत्र देण्यात आलेले असून संपूर्ण सहकार्य करण्याचे सूचित करण्यात आलेले आहे.
कोव्हीड १९ लसीचा पहिला डोस १०० टक्के देणारे नवी मुंबई हे एमएमआर क्षेत्रातील पहिले शहर असून नवी मुंबई महानगरपालिकेने नेहमीच प्रत्येक मोहिमा यशस्वीपणे राबविलेल्या आहेत. युवकांच्या लसीकरणामध्ये पुढाकार घेणारी ‘मिशन युवा स्वास्थ्य’ या मोहिमेची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिका सज्ज असून सर्व महाविद्यालयीन प्रशासनाने व विद्यार्थ्यांनी ही लसीकऱण मोहिम यशस्वी करण्यासाठी संपूर्ण सहकार्य करावे असे आवाहन महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या वतीने करण्यात येत आहे.